कोल्हापूर : हप्ते देण्यासंबंधी बेटिंग बुकींसोबत झालेल्या मोबाईल संभाषणावरून गांधीनगर पोलीस ठाण्यातील कॉन्स्टेबल महादेव पांडुरंग रेपे (वय ३९, सध्या रा. उचगाव, ता. करवीर, मूळ रा. गारगोटी), नारायण पांडुरंग गावडे (४०, सध्या रा. नागाळा पार्क, कोल्हापूर, मूळ रा. नागनवाडी, ता. चंदगड) यांचेसह अत्याचार पिडित विवाहीतेची तक्रार दाखल करुन घेतली नसल्या प्रकरणी जुनाराजवाडा पोलीस ठाण्याचा कॉन्स्टेबल अमित सुळगावकर या तिघांना मंगळवारी खात्यातुन निलंबित केले. पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी याप्रकरणी मंगळवारी आदेश काढले. या कारवाईची धास्ती अनेक पोलीसांनी घेतली आहे.दरम्यान, अवैध व्यावसायिकांशी लागेबांधे असलेल्या जिल्ह्यातील ‘कलेक्टरांसह काही पोलिसांच्या बदल्यांची प्रक्रिया सुरु झाल्याने खळबळ उडाली आहे. पन्नासहून अधिक पोलिसांच्या बदल्यांची प्रक्रिया सुरू झाली आहे.जिल्ह्यातील मटका, क्रिकेट बेटिंग, अवैध मद्यविक्री, अंमली पदार्थ, वेश्या व्यवसाय, अग्निशस्त्रे तस्करी रोखण्याचे आदेश पोलिस अधीक्षक डॉ. देशमुख यांनी दिले होते.
यादवनगर येथे मटका बुकी सलीम मुल्ला याच्या अड्ड्यावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या प्रशिक्षणार्थी पोलिस अधीक्षक ऐश्वर्या शर्मा यांच्या पथकावर जमावाने हल्ला केला. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संशयितांवर कडक कारवाई करणे अपेक्षित असताना काही पोलिसांनी अवैध व्यावसायिकांनाच संरक्षण दिले. गांधीनगर पोलीस ठाण्यातील कॉन्स्टेबल रेपे व गावडे या दोघांनी गांधीनगर येथील एका क्रिकेट बुकीकडे हप्तावसुलीची मागणी केली होती. त्याच्या संभाषणाची क्लिप पोलीस अधीक्षक डॉ. देशमुख यांच्यापर्यंत पोहोचल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली.
डॉ. देशमुख यांनी या प्रकाराची गांभीर्याने दखल घेत ‘त्या’ दोघांची पोलीस मुख्यालयाकडे रवानगी केली होती. या दोघांची चौकशी कोडोली पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक संजीव झाडे यांच्याकडे दिली होती. चौकशीमध्ये ते दोषी आढळले. हा अहवाल डॉ. देशमुख यांना सादर केला होता.दरम्यान पतीच्या व्यवसायासाठी घेतलेल्या ३० हजार रुपयांच्या व्याजापोटी अश्लील व्हिडीओ क्लिप तयार करून ती यूट्यूबवर व्हायरल करण्याची धमकी देऊन विवाहितेवर सामूहिक अत्याचार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तिघा नराधमांच्या विरोधात पिडित विवाहीता तक्रार देण्यासाठी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गेली होती. यावेळी कॉन्स्टेबल अमित सुळगावकर याने तक्रार दाखल न करता अर्ज आपलेजवळ ठेवून संशयित आरोपी हरीश स्वामी, आशिष पाटील, सद्दाम मुल्ला यांना अभय दिले होते. त्यांचेशी त्याचे परस्पर बोलणेही झाले होते. या दोन्ही प्रकरणांची गांर्भीयाने दखल घेत पोलीस अधीक्षक डॉ. देशमुख यांनी तिघा कॉन्स्टेबलना निलंबित केले.