तीन दिवसांच्या सुटीनंतर बँकांत उसळली गर्दीकामकाज सुरू; व्यवहारांना गतीकोल्हापूर : तीन दिवसांच्या सुटीनंतर कोल्हापुरातील राष्ट्रीयीकृत, सहकारी आणि खासगी बँकांचे कामकाज मंगळवारी सुरू झाले. पैसे काढणे-भरणे, धनादेश जमा करण्यासाठी बँकांमध्ये ग्राहकांची गर्दी उसळली. दुपारी दोन वाजेपर्यंत गर्दी दिसून आली.दुसरा शनिवार, रविवार आणि सोमवारी धूलीवंदनाच्या सुटीमुळे सलग तीन दिवस बँका बंद राहिल्या. यानंतर मंगळवारी सकाळी दहा वाजल्यापासून बँकांमधील कामकाज सुरू झाले. शहरासह जिल्ह्यातील बँकांच्या विविध शाखांमध्ये खात्यातून पैसे काढणे, भरणे आणि धनादेश जमा करण्याकरिता ग्राहकांनी गर्दी केली. त्यासह वीज बिल भरण्याकरिता काही बँकांमध्ये गर्दी दिसून आली. तीन दिवसांच्या सुटीच्या कालावधीत अनेकांना पैसे काढण्यासाठी एटीएमचा आधार घ्यावा लागला. ज्यांच्याकडे एटीएम नाहीत, त्यांना बँका सुरू होण्याची प्रतीक्षा करावी लागली. ज्येष्ठ नागरिक, निवृत्तिवेतनधारकांनी दुपारपर्यंत बँकेत हजेरी लावली. उन्हाचा तडाखा बसत असल्याने दुपारी दीडपूर्वीच अनेकांनी बँकेतील व्यवहार पूर्ण करण्यावर भर दिला. बँका सुरू झाल्याने बाजारपेठेतील व्यवहारांना काहीशी गती मिळाल्याचे दिसून आले. दरम्यान, जिल्हा अग्रणी बँक असणाऱ्या बँक आॅफ इंडियाच्या कोल्हापूर विभागात १९ इतक्या कॅश डिपॉझिट (पैसे भरणे) मशीन (सीडीएम) आहेत. यातील कोल्हापूर शहरातील शाहूपुरी, लक्ष्मीपुरी आणि राजारामपुरी बँक शाखेमध्ये सीडीएम कार्यान्वित आहेत. कोल्हापुरातील व्हीनस कॉर्नर, इचलकरंजी आणि विश्रामबाग (सांगली) येथे बल्क नोट अॅक्सेप्टर मशीन (बीएनए) कार्यान्वित आहेत. यातील व्हीनस कॉर्नर वगळता अन्य ठिकाणचे सीडीएम आणि बीएनएल कार्यरत आहेत. व्हीनस कॉर्नर परिसरातील बँकेच्या ई-गॅलरीतील बीएनएलमध्ये नव्या दोन हजार व पाचशेच्या नोटांचे कॅलिब्रेशन करण्याचे काम सुरू आहे. आठवडाभरात हे काम पूर्ण होईल, अशी माहिती बँक आॅफ इंडियाचे माहिती व तंत्रज्ञान विभागाचे वरिष्ठ प्रबंधक विनयकुमार मिश्रा यांनी दिली. (प्रतिनिधी)
तीन दिवसांच्या सुटीनंतर बँकांत उसळली गर्दी
By admin | Published: March 14, 2017 6:38 PM