कोल्हापूर : गिरगाव (ता. भुदरगड) येथील कुटुंबाला मदतीची गरज असल्याचे वृत्त वाचून तीन ज्येष्ठ नागरिक एकत्र आले..एसटीने ते गाव शोधत गेले..आणि त्या कुटुंबाला तब्बल सात वर्षे ते दरमहा मदत करत आहेत. या मदतीचा तानाजी कांबळे कुटुंबाला मोठा आधार मिळाला. त्यातील एका मुलीस आज गुरुवारी सकाळी ११ वाजता येथील आरबीएल बँकेतर्फे सायकल भेट देण्यात येत आहे. किती रकमेची मदत केली यापेक्षा अडचणीच्या काळात कोणी तरी तुमच्या पाठीशी उभे राहते ही भावना मोठी असते, तेच या तिघांनी केले.घडले ते असे : हातावरील पोट असताना वंदना आणि तानाजी यांना तीन मुली झाल्या. कष्ट करून त्यांना लहानाचे मोठे करत असताना अचानक त्यांची दृष्टी कमी आली. ते कमी की काय म्हणून अशातच तानाजी यांचे निधन झाले. हा त्यांच्या वाट्याला आलेला दुर्दैवाचा फेरा वाचून येथील लक्ष्मीपुरीतील रवींद्र देशिंगे (वय ७७), बांधकाम व्यावसायिक प्रशांत मुंचडी (वय ८७) आणि निवृत्त प्राध्यापक आर. एन. हर्डीकर (वय ८८) हे एकत्र आले. त्यांना शोधत ते एसटीने गिरगावला गेले. घर पाहून त्यांच्या डोळ्यात पाणी आले. त्यांनी गावातीलच आर. बी. शेटके यांच्या किराणा दुकानात खाते घातले. त्यांना दरमहा एक हजार रुपयांचे किराणा साहित्य देण्याची व्यवस्था केली. वर्षातून एकदा कपडेही घेऊन देत असत. जून २०१५ पासून ही मदत ते करत आहेत. या मुलींना आयुष्यात दिसणारच नाही असे निदान एका डॉक्टरने केले होते. परंतु हे तिघे शांत बसले नाहीत. त्यातील देशिंगे यांचे सांगलीचे प्रख्यात नेत्रतज्ज्ञ डॉ. दिलीप पटवर्धन हे खास मित्र. त्यांनी त्यांना शब्द टाकल्यावर दोन्ही मुलींवर त्यांनी एक पैसाही न घेता उपचार केले. त्यातून दोघींना चांगली दृष्टी आली. दीप ऑप्टिकल्सने त्यांना चष्मे दिले. त्यातील मोठ्या मुलीचे लग्न झाले. सानिका कॉलेजला जाते, ऋतिका आठवीत आहे. सानिकाला डोंगराळ भागातून रोज कॉलेजला चालत जावे लागते म्हणून देशिंगे यांनी आरबीएल बँकेला सांगितले. तो सायकल भेट कार्यक्रम आज गुरुवारी बँकेत होत आहे.
Kolhapur News: मदतीची गरज असल्याचे वृत्त वाचले; तिघे वृद्ध जोडीदार एकत्र आले, अन् कांबळे कुटुंबाचा आधार बनले
By विश्वास पाटील | Published: August 16, 2023 6:56 PM