जयसिंगपूर : कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी जयसिंगपूर पोलिस ठाण्यातील तीन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. जिल्हा पोलिस प्रमुख महेंद्र पंडित यांनी ही कारवाई केली. विशाल खाडे, अमोल अवघडे व विजय पाटील या तिघा पोलिस कर्मचाऱ्यांवर कारवाई झाल्याने पोलिस वर्तुळात खळबळ उडाली आहे. दरम्यान, अवैध व्यावसायिकांशी असलेल्या सलगीतून ही कारवाई झाल्याचे समजते.पोलिस शिपाई विशाल खाडे, अमोल अवघडे व विजय पाटील यांना शासकीय सेवेतून निलंबित करण्यात येत आहे, असे आदेश जिल्हा पोलिस प्रमुख पंडित यांनी दिले आहेत. त्यामुळे पोलिस वर्तुळात खळबळ उडाली आहे. निलंबित कार्यकाळात निलंबित कर्मचाऱ्यांनी कोल्हापूर मुख्यालय येथे राखीव पोलिस निरीक्षक या ठिकाणी हजेरी देण्यात यावी. तसेच पोलिस उपअधीक्षक कोल्हापूर यांच्या परवानगीशिवाय मुख्यालय सोडण्यात येऊ नये, असेही आदेशात म्हटले आहे.दरम्यान, आठ महिन्यांपूर्वी शहरातील राजकीय व्यक्तीबरोबरच, व्यापारी, व्यावसायिक व सामाजिक कार्यकर्त्यांनी पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्याकडे तक्रार केली होती. यानंतर पोलिस कर्मचाऱ्यांची चौकशी करण्याचे आदेश विभागीय पोलिस तक्रार प्राधिकरण, पुणे यांनी जयसिंगपूरच्या पोलिस निरीक्षकांना दिले होते. याअनुषंगाने ही कारवाई करण्यात आली असल्याची शहरात उलटसुलट चर्चा आहे.
Kolhapur: कर्तव्यात कसूर, जयसिंगपुरातील तीन पोलिस कर्मचारी निलंबित; पोलिसप्रमुखांचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: August 09, 2024 3:51 PM