कोल्हापूर : गेल्या तीन वर्षांपासून या टोळीचा शोध जोधपूर पोलीसही घेत आहेत; मात्र ते पोलिसांना हुलकावणी देत आहेत. गॅगस्टार शामलाल याचे हुबळीमध्ये घर, शेती आणि गॅस एजन्सी आहे; त्यामुळे या ठिकाणी ही टोळी स्थिर होण्याच्या प्रयत्नात होती; त्यासाठी गेल्या सात महिन्यांपासून ते कर्नाटकात वारंवार ये-जा करीत होते. अनेकदा खासगी वाहनाने ते हुबळी येथे दाखल झाले. हुबळी आणि परिसरात ते दोन ते तीन दिवस राहून परत जात होते. दरम्यान, पोलिसांबरोबर चकमक होण्यापूर्वीच्या आदल्या दिवशी सोमवारी त्यांनी हुबळी येथे पार्टीही केल्याचे प्राथमिक तपासात उघड होत आहे.
राजस्थान, हुबळी ते पुणे अशी ड्रग्जची तस्करी करत असल्याचीही माहिती तपासात पुढे आली आहे. ही गँग ००७ या नावाने कार्यरत होती. चकमकीत गंभीर जखमी झालेला शामलाल हाच टोळीचा म्होरक्या असल्याचेही पुढे येत आहे. राजस्थानातून कारवाई करून कर्नाटकात स्थिर होण्याच्या तयारीत होती; त्यामुळेच ते वारंवार गेल्या सात महिन्यांपासून कर्नाटकात फेऱ्या मारत आहेत; मात्र मंगळवारी (दि. २८) रात्री झालेल्या चकमकीमुळे त्यांचा इरादा उधळला गेला.कारचालक श्रीरामकडे तीन तास कसून चौकशीपोलीस कोठडीत असलेला कारचालक श्रीराम याच्याकडे पोलिसांनी तीन तास कसून चौकशी केली. या चौकशीला त्याने थंडा प्रतिसाद दिला. त्याचे मोबाइल कॉल डिटेल्स, व्हॉटस अॅप, फेसबुक अकाउंटची माहिती घेतली आहे. त्याने दोन दिवसांच्या कालावधीत संपर्क केलेले कॉल डिटेल्स तपासले. त्याने यू ट्यूबवर पिस्तूल घेऊन नाचत असलेले फोटो, व्हिडिओ व्हायरल केले आहेत. यासंदर्भात राजस्थान पोलिसांत गुन्हा दाखल आहे. त्याची चौकशी करून या टोळीत कर्नाटक आणि पुणे येथील कोणी सहभागी आहे का, पुणे येथे तो कोणाशी अमली पदार्थांची विक्री करणार होता, याचा तपास सुरू केला आहे.