कोल्हापूर : जिल्हा प्रशासनाने लॉकडाऊनच्या काळात परराज्यांतील कामगार, नागरिकांकरिता ‘कम्युनिटी किचन’ सुरू करण्याचे दानशूर कोल्हापूरकरांना हाक दिली होती. त्या हाकेस आनंद कोझी हॉटेलचे मालक आनंद माने यांनी प्रतिसाद देत रोज तीनशेजणांकरिता जेवणाची पॅकेटस् पुरविण्यास सुरुवात केली आहे.शहरातील कदमवाडी, साळोखेनगर, एम.आय.डी.सी., उजळाईवाडी, कसबा बावडा, आदी परिसरात विविध राज्यांतील कामगार, नागरिक संचारबंदीमुळे अडकले आहेत. जिल्हा प्रशासनाने प्रत्येक तालुक्यांत तीन ठिकाणी दानशूर संस्था, व्यक्तींना अशा नागरिकांकरिता कम्युनिटी किचन सुरू करून जेवण तयार करून देण्याचे आवाहन केले होते. त्यास लक्ष्मीपुरी येथील हॉटेल आनंद कोझीचे मालक आनंद माने यांनी तत्काळ प्रतिसाद दिला.
त्यानुसार त्यांनी आपल्या या हॉटेलमधून गेल्या चार दिवसांपासून रोज तीनशे लोकांकरिता जेवणाची पॅकेटस् पुरविण्यास सुरुवात केली आहे. यासाठी स्वत: आनंद माने, माजी उपमहापौर अर्जुन माने, किरण माने, राजेंद्र पाटील, विठ्ठल पाटील, सुभाष जाधव, धैर्यशील भरणकर, अमित जाधव व हॉटेलमधील कर्मचारी वर्ग परिश्रम घेत आहेत.खास आचारीहॉटेलमधील नेहमीचे कुक घरात अडकल्यामुळे माने यांनी चपात्या करणाऱ्या चार महिला व दोन आचाऱ्यांची नेमणूक केली आहे. जेवण तयार केल्या जाणाऱ्या भटारखान्यात स्वच्छतेची सर्व मानके पाळली जातात. रोज वेगवेगळा मेन्यू जेवणात केला जातो.
यात पुलाव, मिश्र खिचडी, कोल्हापुरी मिक्स व्हेज, बटाटा, वांगे मिश्र भाजी, दोन चपात्या असे स्वरूप या जेवणाचे असते. त्याकरिता सकाळी सात वाजल्यापासून चपात्या करण्यास सुरुवात केली जाते. अकरा वाजता सर्व पॅकेटस् भरून तयार केली जातात. जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश आल्यानंतर ती खास गाडीतून त्या त्या ठिकाणी पोहोच केली जातात.
संचारबंदीच्या काळात राज्यासह परराज्यातील अडकलेल्या कामगार, नागरिकांच्या जेवणाची सोय व्हावी. याकरिता जिल्हाधिकाऱ्यांच्या संकल्पनेतून या ‘कम्युनिटी किचन’ची सुरुवात चार दिवसांपूर्वी केली आहे. त्याकरिता सर्व साहित्य जिल्हा प्रशासन पुरवित आहे.- आनंद माने, माजी अध्यक्ष, चेंबर आॅफ कॉमर्स व मालक हॉटेल आनंद कोझी.