कोल्हापूर : येथील राजेंद्रनगर झोपडपट्टीत गॅस गळतीमुळे स्फोट होऊन तिघे जण जखमी झाले. यामध्ये दोन घरांतील प्रापंचिक साहित्याचे मोठे नुकसान झाले. शेजारील घराची भिंत पडली असून, परिसरातील तीन-चार घरांच्या भिंतींना तडे गेले आहेत. ही घटना रविवारी सकाळी घडली. या दुर्घटनेत सुमारे साडेपाच लाखांचे नुकसान झाले. स्फोटाचा मोठा आवाज आल्याने परिसर हादरला.
या दुर्घटनेत कुमार सदाशिव लाटवडे (वय ३८), राजू शामराव सोनुले (४५), त्याची पत्नी वैशाली राजू सोनुले (वय ३५, रा. राजेंद्रनगर झोपडपट्टी) हे जखमी झाले आहेत.
राजेंद्रनगर झोपडपट्टी येथे कुमार सदाशिव लाटवडे व त्यांच्या पत्नी सुजाता लाटवडे हे कुटुंब राहते. रविवारी सकाळी कुमार लाटवडे यांनी अंघोळीसाठी घरातील बाथरूममधील गॅस गिझर सुरू केला. त्यावेळी गिझर ते गॅस सिलिंडरपर्यंत जाणाऱ्या पाइपमधून गॅस गळती सुरू होती. गॅस गिझर सुरू करताच अचानक गॅसचा मोठा स्फोट झाला. या स्फोटामुळे परिसरत हादरला. या स्फोटात लाटकर हे भाजून गंभीर जखमी झाले, तर शेजारच्या घराची भिंत पडल्याने त्याखाली सापडून राजू सोनुर्ले व त्याची पत्नी वैशाली सोनुर्ले हे दोघे जखमी झाले. परिसरातील नागरिकांनी या स्फोटातील नुकसान झालेल्या घरांच्या ढिगाऱ्यातून तिघांना जखमी अवस्थेत बाहेर काढून सीपीआर रुग्णालयात दाखल केले.