कोल्हापूर : राजेंद्रनगर झोपडपट्टीत दत्त मंदिरशेजारी गॅस गळतीमुळे स्फोट होऊन तिघेजण जखमी झाले. यामध्ये दोन घरांतील प्रापंचिक साहित्याचे मोठे नुकसान झाले. शेजारील घराची भिंत पडली असून, परिसरातील तीन-चार घरांच्या भिंतींना तडे गेले आहेत. ही घटना रविवारी सकाळी घडली. या दुर्घटनेत सुमारे साडेपाच लाखांचे नुकसान झाले. स्फोटाचा मोठा आवाज आल्याने परिसर हादरला.
जखमींची नावे पुढीलप्रमाणे : कुमार सदाशिव लाटवडे (वय ३८), राजू शामराव सोनुले (४५), त्याची पत्नी वैशाली राजू सोनूले (वय ३५ रा. राजेंद्रनगर झोपडपट्टी).
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, राजेंद्रनगर झोपडपट्टी येथे दत्त मंदिरशेजारी कुमार सदाशिव लाटवडे व त्यांच्या पत्नी सुजाता लाटवडे हे कुटुंब राहते. रविवारी सकाळी कुमार लाटवडे यांनी अंघोळीसाठी घरातील बाथरूममधील गॅस गिझर सुरू केला. त्यावेळी गिझर ते गॅस सिलिंडरपर्यंत जाणाऱ्या पाइपलाइनला गॅस गळती लागली होती. गॅस गिझर सुरू करताच अचानक गॅसचा मोठा स्फोट झाला. या स्फोटामुळे परिसर हादरला. या स्फोटात लाटकर हे भाजून गंभीर जखमी झाले, तर शेजारच्या घराची भिंत पडल्याने त्याखाली सापडून राजू सोनुर्ले व त्याची पत्नी वैशाली सोनुर्ले हे दोघे जखमी झाले. स्फोटाचा मोठा आवाज आल्यानंतर परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी भेट देऊन मदतीसाठी हातभार लावला. नागरिकांनी या स्फोटातील नुकसान झालेल्या घराच्या ढिगाऱ्यातून तिघांना जखमी बाहेर काढले. काही वेळातच अग्निशमन दलाचा बंब घटनास्थळी दाखल झाला. त्यांनी तातडीने जखमी तिघांनाही सीपीआर रुग्णालयात हजर केले.
दरम्यान, स्फोटात लाटवडे यांच्या घरातील प्रापंचिक साहित्याचे मोठे नुकसान झाले. शेजारील सोनुर्ले यांच्या घराचीही भिंत पडल्याने मोठे नुकसान झाले. तसेच घराच्या दर्शनी दरवाजा, लोखंडी तिजोरी, किचनकट्टा, पूर्वेकडील भिंती व घराबाहेरील बाजूच्या भिंतीचे असे सुमारे साडेपाच लाख रुपयांचे नुकसान झाले.
फोटो नं. ०७०३२०२१-कोल-फायर०१
ओळ : कोल्हापुरात राजेंद्रनगरात कुमार लाटवडे यांच्या घरी गॅस गळती होऊन स्फोटात प्रापंचिक साहित्याचे नुकसान झाले.