गांधीनगर : येथे गाढवाच्या हल्ल्यात तीनजण जखमी झाले. ही घटना शुक्रवारी सकाळी अकराच्या सुमारास विक्रम हायस्कूलच्या पटांगणात घडली. लक्ष्मण देऊ कुसाळे (वय ७५) गोपीचंद वरूमल कामरा (५२, दोघे रा. वळीवडे, ता. करवीर) व मयुरी कुमार जाधव (११, पोवार मळा, उचगाव) अशी जखमींची नावे आहेत. जखमींना गांधीनगर येथील वसाहत रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.गांधीनगर वळीवडे परिसरात भटक्या जनावरांचे प्रमाण वाढले आहे. वारंवार जनावरांच्या उपद्रवामुळे अनेकजण जखमी होत आहेत. नागरिकांनी वेळोवेळी गांधीनगर, वळीवडे ग्रामपंचायतीला कळवूनही त्यावर उपाययोजना केलेल्या नाहीत. त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासन हतबल झाले आहे की काय?, एखादी मोठी दुर्घटना घडल्यानंतर ग्रामपंचायत प्रशासन जागे होणार का, असे प्रश्न स्थानिक नागरिकांना पडले आहेत. काही दिवसापूर्वी भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात १३ जण जखमी झाले होते. त्या कुत्र्यांचा बंदोबस्तही केलेला नाही.गांधीनगर परिसरात लहान मुले, वृद्ध फिरत असतात. त्यांना या कुत्र्यांच्या आणि गाढवांचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे नागरिकांतून संताप व्यक्त केला जात आहे. त्यामुळे गांधीनगर आणि वळीवडे ग्रामपंचायत प्रशासनाने हद्दीत मोकाट फिरणाऱ्या भटक्या जनावरांचा बंदोबस्त करावा आणि संबंधित गाढव मालकावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी जोर धरू लागली आहे.
गाढवाच्या हल्ल्यात तिघे जखमी, गांधीनगर ग्रामपंचायत प्रशासन हतबल
By ऑनलाइन लोकमत | Published: July 08, 2023 3:42 PM