कोल्हापूर : फुलेवाडी रिंग रोड, बोंद्रेनगर येथे दोन दिवसांपूर्वी चौघांनी केलेल्या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा सीपीआर रुग्णालयामध्ये उपचार सुरू असताना शुक्रवारी मृत्यू झाला. उदय खंडू सुतार (वय २४, रा. मातंग वसाहत, बोंद्रेनगर) असे त्याचे नाव आहे. संतप्त नागरिकांनी करवीर पोलीस ठाण्यावर मोर्चा काढून आरोपींना अटक करण्याची मागणी केली. त्यानुसार पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून तिघांना अटक केली; तर एका विधिसंघर्ष मुलाला ताब्यात घेतले. संशयित आरोपी बाबूराव बबन देवणे (२८), बबन सिंधू गावडे (३२), राहुल बाबू कात्रट (२७ ,सर्व रा. बोंद्रेनगर) अशी त्यांची नावे आहेत.
उदय सुतार याच्या वडिलांचे चार वर्षांपूर्वी निधन झाले. घरी तो आई, पत्नी यांच्यासोबत राहत होता. मिळेल तिथे मजुरीची कामे करीत असे. त्याची पत्नी चार दिवसांपूर्वी माहेरी कनाननगर येथे गेल्याने घरी तो व आई असे दोघेच होते. बुधवारी (दि. ११) रात्री बोंद्रेनगर बसस्टॉपवर त्याची चंदू ऊर्फ चंद्या नावाच्या तरुणाशी दारूवरून वादावादी झाली. यावेळी चंदूने साथीदार बाबूराव देवणे, बबन गावडे, राहुल कात्रट यांना बोलावून घेतले. त्यांनी उदयला बेदम मारहाण केली. तो दारूच्या नशेत असल्याने रस्त्यावर पडून राहिला. काही वेळाने त्याचा मित्र प्रवीण वायदंडे या ठिकाणी आला. त्याला उदय पडलेला दिसताच त्याने त्याला उठवून घरी सोडले. त्यानंतर जेवण करून पुन्हा तो बोंद्रेनगर स्टॉपवर आला. या ठिकाणी उलट्या होऊ लागल्याने प्रवीण व त्याच्या आईने त्याला घरी नेले. गुरुवारी (दि. १२) पहाटे त्याची प्रकृती बिघडल्याने सीपीआर रुग्णालयात दाखल केले.
उपचार सुरू असताना तो बेशुद्ध पडला. करवीर पोलीस चौकशीसाठी गेले असता त्याच्या आईने त्याला मारहाण झाल्याचे सांगितले. कोणी मारहाण केली हे माहीत नव्हते. पोलिसांनी त्याच्या पत्नीकडे चौकशी केली असता ‘उदयने बुधवारी रात्री मला फोन करून धनगरवाड्यातील तरुणांनी मारहाण केली आहे. मी आज येत नाही, उद्या येतो, असा निरोप दिला होता असे सांगितले. डॉक्टरांशी चर्चा केली असता मेंदूत रक्तस्राव झाला असून प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले. पोलीस निरीक्षक दिलीप जाधव यांनी उदयचा मित्र प्रवीण याच्याकडून मारहाण करणाºया तरुणांची नावे निष्पन्न केली. त्यांच्यावर खुनाचा प्रयत्न या कलमाखाली गुन्हा दाखल केला.दरम्यान, ‘सीपीआर’मध्ये उपचार सुरू असताना शुक्रवारी सकाळी उदयचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूची बातमी मातंग वसाहतीमध्ये समजताच येथील दीडशे पुरुष-महिला सीपीआरमध्ये आले. तेथून त्यांनी करवीर पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला. याठिकाणी विजयसिंह उर्फ रिंकू देसाई यांच्यासह साथीदारांना अटक करा, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी मागणी पोलीस निरीक्षक जाधव यांच्याकडे केली.
नागरिकांचा संताप पाहून पोलिसांनी तिघांना अटक केली. तर विधिसंघर्ष मुलाला ताब्यात घेतले. त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर मृतदेह ताब्यात घेतला. या प्रकरणातील आणखी दोन आरोपी पसार असून त्यांचा पोलीस शोध घेत आहेत.रिंकू देसाई यांच्याकडे चौकशी करणार रिंकू देसाई हे बोंद्रेनगर परिसरातील सामाजिक कार्यकर्ते आहेत. त्यांच्या साथीदारांनी उदयला मारहाण केली आहे. देसाई हे आरोपींना पाठीशी घालतात. याच संशयितांनी आठ दिवसांपूर्वी आणखी एका तरुणाला मारहाण केली होती. ‘देसाई हे चिथावणी देतात; त्यांना अटक करा’ अशा मागणीचे लेखी निवेदन तेथील नागरिकांनी पोलीस निरीक्षक जाधव यांना दिले. त्यानुसार या प्रकरणी देसाई यांच्याकडे चौकशी करणार असल्याचे निरीक्षक जाधव यांनी सांगितले.