गडहिंग्लज : चंदगड-गडहिंग्लज रस्त्यावरील हरळी बुद्रुक येथील इंचनाळ फाट्यावर थांबलेल्या कारला कंटेनरने जोरदार धडक दिल्याने कारमधील तीन महाविद्यालयीन विद्यार्थी ठार झाले, तर दोघेजण जखमी झाले. रात्री साडेअकराच्या सुमारास हा अपघात झाला.चंदगडहून कंटेनर (एमएच ४६ बीबी ६४९९) हा गडहिंग्लजकडे मोलॅसिस घेऊन येत होता. गडहिंग्लजपासून सुमारे सात किलोमीटरवर असलेल्या हरळी बुद्रुक येथे महादेव मंदिराजवळील इंचनाळ फाटा येथे वॅगनआर कार (एमएच ०९ बीएम ८६१९) ही थांबली होती. या कारमध्ये महागाव येथील एका अभियांत्रिकी महाविद्यालयाचे पाच विद्यार्थी होते. त्यातील दोघेजण लघुशंकेसाठी खाली उतरले होते. तर तिघेजण कारमध्येच होते. चंदगडहून येणाऱ्या कंटेनरने हरळी येथील महादेव मंदिराच्या शेडला घासत तेथे जवळच असलेल्या ३० स्पीडच्या दिशादर्शक खांबाला धडकून पुढे थांबलेल्या या कारला जोरदार धडक दिली. त्यात तिघेजण जागीच ठार झाले. सूरज तिप्पे (रा. तमनाकवाडा, ता. कागल), विशाल पांडुरंग पाटील (गोकुळ शिरगाव), आणि सूरज भरमा पाटील (बेळगाव) अशी त्यांची नावे आहेत. तर संदेश तिप्पे (रा. तमनाकवाडा) आणि अजिनाथ खुडे हे दोघे जखमी झाले आहेत. हे पाचही जण गडहिंग्लज येथे भाड्याने खोली घेऊन राहत होते. ते नेसरी येथील एका मित्राच्या घरी गेले होते. तेथून परत जात असताना रात्री साडेअकराच्या सुमारास इंचनाळ फाटा येथे ते थांबले असता कंटेनरने त्यांना उडविले. हा अपघात इतका जोरदार होता की, त्यात कारचा चक्काचूर झाला आहे. जखमींवर गडहिंग्लज उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गडहिंग्लज पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला आहे.पंधरा दिवसांतील तिसरा अपघातयाच रस्त्यावर १३ तारखेला झालेल्या दोन अपघातात महागावजवळ नूलचे पाचजण ठार झाले होते. तर हरळीजवळ नेसरीचे तीनजण ठार झाले होते. सोमवारी हरळी येथे तिसरा अपघात झाला त्यात तीनजण ठार झाल्याने गेल्या १६ दिवसांत या रस्त्यावर ११ जणांचा बळी गेला आहे.घटनास्थळीचे दृष्य हृदय हेलावणारेया अपघातात कारचा चक्काचूर झाला असून, घटनास्थळी रक्ताचे सडे पडले होते. हे दृश्य हृदय हेलावून टाकणारे होते.
हरळीत कंटेनरच्या धडकेने तीन ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2019 1:21 AM