गडहिंग्लज : सेवावर्धिनी संस्थेच्या माध्यमातून गेल्या ३ वर्षांपासून सुरू असलेल्या गडहिंग्लज तालुक्यातील बसर्गे ग्रामविकास प्रकल्पातील जलसंधारणाच्या कामांना वेग आला असून बसर्गेच्या माळरानावर सलग समतल चर (सी सी टी) करण्यासाठी मिळालेल्या निधीमधून तीन किलोमीटर लांबीचे चर तयार करण्यात आले आहेत.
पुण्यातील अटलास कॉपको कंपनीने या प्रकल्पाला आर्थिक पाठबळ दिले आहे. बसर्गेमध्ये २0१५ मध्ये कंपनीच्या सी एस आर निधीतून वॉटर फिल्टर बसवण्यात आले असून ग्रामपंचायतीने तो यशस्वीपणे सुरू ठेवला आहे.
ग्रामपंचायतीच्या सहकायार्मुळे व डॉ राजेंद्र हिरेमठ यांच्या प्रयत्नातून कंपनीने यावर्षी बसर्गेच्या विकासासाठी निधी उपलब्ध करुन दिला आहे. या निधीमधून यावर्षी तीन किमी लांबीचे चर करण्यात आले.
बसर्गे धनगरवाड्याजवळील माळरानावर हे सी सी टी करण्यात आले असून त्याठिकाणच्या अटलास कॉपको कंपनीच्या फलकाचे अनावरण कंपनीच्या कॉपोर्रेट कम्युनिकेशन हेड शालिनी शर्मा यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांनी केलेल्या कामाची पाहणी केली व फिल्टर विषयी आढावा घेतला.
यानंतर शर्मा यांनी बसर्गे ग्रामस्थ, ग्रामपंचायत सदस्य, विद्यार्थी व महिलांशी संवाद साधला व त्यांच्या अपेक्षा, अनुभव, मते जाणून घेतली. तसेच सेवावर्धिनीच्या जलदुत प्रकल्पाअंतर्गत पुढील कामांसाठी सुद्धा सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
या प्रसंगी कंपनीचे अधिकारी कुलदीप पुरंदरे, सेवावर्धिनीचे प्रमोद कुलकर्णी, हर्षन पाटील, डॉ. राजेंद्र हिरेमठ तसेच बसर्गेचे उपसरपंच सुरेश माणिकेरी, ग्रामविकास अधिकारी शशिकांत कुंभार, महिला ग्रामपंचायत सदस्य, जलदुत लता हिरेमठ, तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.
विद्यार्थ्यांना आर्थिक मदत
यावेळी बसर्गेच्या एस एम हायस्कूल च्या इयत्ता पाचवी ते दहावी मधील १५ गरीब, गरजू व हुशार विद्यार्थ्यांना हिरेमठ कुटुंबियांकडून शालिनी शर्मा यांच्या हस्ते आर्थिक मदत करण्यात आली. यावेळी हायस्कुलचे मुख्याध्यापक रामचंद्र टेळे तसेच गणित, विज्ञान विषयाचे शिक्षक उपस्थित होते.