कोल्हापूर : एमबीबीएसच्या शिक्षणासाठी युक्रेनला गेलेल्या व काळजाचा तुकडा असलेल्या लेकी युक्रेनमध्ये अडकल्याने कोल्हापुरात पालकांच्या जीवाला घोर लागला आहे. येथील तीन विद्यार्थिनी युक्रेनमधील बुकोविनीयन विद्यापीठात असून, त्यांना भारतीय दूतावासाने रुमानियाला हलवले आहे. तेथून विमानाने त्या दिल्लीला येणार असून, येथे सुरक्षित पोहोचेपर्यंत पालकांचा जीव मात्र कासावीस झाला आहे. सोमवारपर्यंत त्या कोल्हापूरला परतण्याची शक्यता आहे.कदमवाडीतील प्राजक्ता पाटील, फुलेवाडी येथील ऋतुजा कांबळे, शुक्रवार पेठेतील आर्या चव्हाण या तिघी युक्रेनमध्ये शिकत आहेत. गुरुवारी युक्रेनवर हल्ले सुरू झाल्यानंतर त्या आणि पालक सगळेच घाबरले. पालकांनी जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधला आहे.
व्हिडिओ कॉलद्वारे आपत्ती व्यवस्थापन कक्षातून पालक या तिघींशी बोलले आहेत. त्या सुखरूप आहेत. विद्यापीठाने विद्यार्थ्यांना हॉस्टेल रिकामी करण्यास सांगितले असून, भारतीय दूतावासाने त्यांना बसने रुमानियाला पाठविले आहे, तेथून दाेन भारतीय विमानांनी सर्वांना दिल्लीत आणण्यात येईल.कदमवाडीतील निवृत्त सैनिक सुनील पाटील यांची मुलगी प्राजक्ता ही एमबीबीएसच्या दुसऱ्या वर्षात आहे. सामानाची बांधाबांध करण्याची घाई असल्याने ती पालकांशीदेखील फार बोलू शकली नाही. रुमानियाला जाणाऱ्या विद्यार्थिनींच्या यादीत अजून तिचे नाव आले नव्हते.
मात्र हॉस्टेलने जेवण बंद केल्याने जवळ असलेले खाद्यपदार्थ ती पुरवून पुरवून खात आहे. शुक्रवार पेठेतील रेशन दुकान व्यावसायिक नितीन चव्हाण यांची मुलगी आर्या व फुलेवाडी येथील प्राध्यापक जेलीत कांबळे यांची मुलगी ऋतुजा यांनी याच वर्षी एमबीबीएसला प्रवेश घेतला आहे. पालकांशी शेवटचे बोलणे झाले त्यावेळी त्या बसमधून रुमानियाला निघाल्या होत्या.
गेली दोन वर्षे माझी मुलगी युक्रेनमध्ये आहे. दोन्ही देशांत चर्चा सुरू असल्याने युद्धाची वेळ येणार नाही असे वाटले होते. पण, हल्ले सुरू झाल्यापासून धडकीच भरली. प्राजक्ता सुखरूप आपल्या देशात परतेपर्यंत चैन पडणार नाही. - सुवर्णा पाटील, प्राजक्ता पाटीलची आई
युद्धजन्य परिस्थितीमुळे २० तारखेपासूनच आम्ही विमानाच्या बुकींगसाठी प्रयत्न करीत होतो. उद्याचे (शनिवार) तिकीट काढले होते. दरम्यान, हल्ले सुरू झाले आणि विमानतळ बंद झाले. हा परिसर युद्धापासून सुरक्षित आहे. आमचं बोलणं झालं तेंव्हा ऋतुजा रुमानियाला निघाली होती. -जेलीत कांबळे, ऋतुजा कांबळेचे वडील