कोल्हापूर : आंबोली ते आजरा मार्गावर गवसे गावच्या हद्दीत मद्याची अवैद्य वाहतूक करणारी मोटारकार पकडली. या कारवाईत सुमारे ३ लाख ५८ हजारांचा विदेशी मद्यसाठा व मोटारकार, असा सुमारे ८ लाख ७८ हजार ३२० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.ही कारवाई आज, शनिवारी पहाटेच्या सुमारास राज्य उत्पादन शुल्क कोल्हापूर विभागाच्या भरारी पथकाने केली. कारवाईत मोटारचालक डॅनिश कामिल फर्नांडिस (वय २६, रा. इन्सुली पागावाडी, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग) याला अटक केली.राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिलेली माहिती अशी की, आंबोली ते आजरा या मार्गावर मद्याची अवैद्य वाहतूक होत असल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकास मिळाली. पथकाने या मार्गावर शनिवारी पहाटेच्या सुमारास सापळा रचला, त्यावेळी गवसे (ता. आजरा) मार्गावर संशयावरून एका मोटारीची तपासणी केली.यावेळी कागदी पुठ्ठ्याच्या बॉक्समध्ये गोवा राज्यात विक्रीकरिता असलेल्या भारतीय बनावटीचे विदेशी मद्याचा साठा सापडला. पथकाने ४३ बॉक्समधील मद्याच्या ८०४ सीलबंद बाटल्या, तसेच मोटारकार, असा सुमारे ८ लाख ७८ हजार ३२० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.ही कारवाई उत्पादन शुल्क विभागीय भरारी पथकाचे कोल्हापूर विभागाचे उपायुक्त यशवंत पवार यांच्या आदेशाने दुय्यम निरीक्षक पी.आर. पाटील, आर.जी. यवलुजे, जे.एस. पवार, कॉन्स्टेबल सुशांत बनसोडे, विलास पवार, अमोल यादव, संतोष बिराजदार, दीपक कापसे आदींच्या पथकाने केली.
आंबोली-आजरा मार्गावर गवसेजवळ साडेतीन लाखांचा विदेशी मद्यसाठा जप्त, एकास अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2022 2:53 PM