कोल्हापूर : शिवशाहू चषक फुटबॉल स्पर्धेत मंगळवारी इतिहास घडला. वेताळमाळ तालीम मंडळ विरुध्द खंडोबा तालीम मंडळ यांच्यात उपांत्यफेरीत झालेल्या लढतीत फुटबॉलच्या इतिहासात प्रथमच वेताळमाळ तालमीच्या खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी दीड लाख रुपयांची वैयक्तिक बक्षीस मैदानावर देण्यात आली.
कोल्हापूरातील फुटबॉल म्हणजेच इर्षा असे समीकरण आहे. फुटबॉलचा खेळ म्हणजे उत्साहाचा आणि इर्षेचा माहोल. शाहू स्टेडियमवरील फुटबॉलचे हे सामने पाहण्यासाठी हंगाम कोणताही असो, गर्दी ही होतेच. मंगळवारी या मैदानावर शिव शाहू चषक फुटबॉल स्पर्धेत खंडोबा आणि वेताळमाळ या दोन तालमीचे संघ मैदानात एकमेकांच्याविरोधात उतरले होते. पूर्वार्धात खंडोबा तालमीच्या खेळाडूने वेताळमाळ तालमीच्या विरोधात एक गोल केल्याने आपल्या खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे म्हणून वेताळमाळ तालमीचे एक चाहते आणि रहिवाशी राजेंद्र बाबुराव साळोखे यांनी तालमीच्या पहिल्या गोलसाठी तब्बल ५१ हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले. इतकेच नव्हे तर या बक्षीसांची रक्कम संयोजकाकडे तत्काळ देउन ठेवली. स्पीकरवरुन संयोजकांनी ही रक्कम जाहीर करताच वेताळमाळच्या आकाश माळी याने ५६ व्या मिनिटाल लगेच गोल करुन ही रक्कम जिंकली. पाठोपाठ इर्षेने खंडोबाच्या खेळाडूने दुसरा गोल करताच साळोखे यांनी दुसऱ्या गोलसाठी चक्क १ लाख १००० रुपयांचे बक्षीस जाहीर केले. त्यामुळे ७३ व्या मिनिटाला वेताळमाळच्या सर्वेश वाडकरने गोल करुन ही रक्कम जिंकून बरोबरी केली. साळोखे यांनी तिसऱ्या गोलसाठीही १ लाख ५१ हजार रुपयांची बक्षीस जाहीर केले. परंतु वेळ संपेपर्यंत गोल झाला नाही. त्यामुळे टायब्रेकर घेण्यात आला. त्यामुळे तिसऱ्या गोलसाठी जाहीर केलेली बक्षीसांची ही रक्कम वेताळमाळ तालमीसाठी देण्याचा निर्णय घेतला.