अनिल पाटील -मुरगूड -जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून मुरगूड (ता. कागल) येथील निसर्गमित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी परिसरातील डोंगर माथ्यावर सुमारे विविध झाडांच्या तीन लाख बियांची हवाई पेरणी केली. या अनोख्या उपक्रमाशिवाय झाडांचा वाढदिवस, वृक्षारोपण, आदी कार्यक्रमही उत्साहात पार पडले.मुरगूड शहर निसर्गमित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष वृक्षमित्र प्रवीण सूर्यवंशी यांच्या पुढाकाराने मंडळाच्या अनेक कार्यकर्त्यांनी मुरगूड, दौलतवाडी, करंजिवणे, आदी भागातील डोंगर माथ्यावर सुमारे तीन लाख बिया हवाई पद्धतीने पेरल्या. डोंगरावरील झाडांची संख्या प्रचंड प्रमाणात कमी होत आहे. उजाड झालेले डोंगर हिरवाईने पुन्हा नटावेत, यासाठी मंडळाने हा उपक्रम हाती घेतला आहे. विविध जातींच्या झाडांच्या बिया पेरल्या, तर हा परिसर झाडांनी बहरून जाईल. या हेतूनेच हा उपक्रम पार पडला. पेरणी केलेल्या या बियांमध्ये करंज, अर्जुन, बेहडा, जांभळ, चंदन, करवंद, साग, पळस, सिसव, भोकर, फणस, लिंबू, आदी झाडांच्या बियांचा समावेश होता. प्रारंभी नव महाराष्ट्र चौकातील सप्तपर्णीच्या वृक्षाचा वाढदिवस अवचितवाडी निसर्गमित्र मंडळाचे अध्यक्ष अजिंक्य वास्कर यांच्या हस्ते केक कापून साजरा करण्यात आला. यावेळी ‘पर्यावरणातील वृक्षाचे महत्त्व’ या विषयावर प्रवीण सूर्यवंशी यांनी ‘पर्यावरण विषया’च्या चित्रफिती दाखवून सखोल मार्गदर्शन केले. यावेळी शिवराज विद्यालयाचे प्राचार्य महादेव कानकेकर प्रमुख उपस्थित होते. त्यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. यावेळी चंद्रकांत हवालदार, सूरज मोरबाळे, दत्ता कदम, डी. बी. देसाई, गजराज माने, मृत्युजंय सूर्यवंशी, ऋषिकेश चौगुले, सुशील सोनवणे, प्रसाद खैरे, विजय माने, अमर खैरे, पृथ्वीराज सावर्डेकर, सुभाष खैरे, अभिजित मगदूम, रविराज पाटील, संदीप वरपे, विजय कुंभार, रोहन साळोखे, आदी उपस्थित होते. शशिकांत सुतार यांनी आभार मानले.
डोंगरावर तीन लाख बियांची हवाई परेणी
By admin | Published: June 08, 2015 12:16 AM