कुसूर : तारुख, ता. कऱ्हाड येथील पांढरीची वाडी येथे ‘धरे’ नावच्या शिवारात सोमवारी दुपारी बिबट्याचे तीन बछडे आढळून आले. वनविभागाने बछड्यांना ताब्यात घेऊन त्याचठिकाणी ठेवले. त्यानंतर सायंकाळी मादी बिबट्याने त्याठिकाणी येऊन तिन्ही बछड्यांना सोबत नेले.
तारुखच्या पांढरीची वाडीमध्ये धरे नावच्या शिवारात शंकर तुकाराम ढेरे यांच्या शेतामध्ये सोमवारी ऊसतोडी सुरू होती. मजूर ऊस तोडणी करीत असताना त्यांना फडात बिबट्याचे तीन बछडे दिसले. बछड्यांना पाहताच बिबट्या आसपास असावा, या भीतीने मजुरांनी तेथून धूम ठोकली. याबाबत शंकर ढेरे यांनी पोलीस पाटील सतीश भिसे यांना माहिती दिली. पोलीस पाटील भिसे यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून वनाधिकारी व मानद वन्यजीवरक्षक रोहन भाटे यांना याबाबत कळविले. माहिती मिळताच वनक्षेत्रपाल तुषार नवले, मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे, हेमंत केंजळे, वनपाल बाबूराव कदम, वनरक्षक रमेश जाधवर, भारत खटावकर तातडीने त्याठिकाणी दाखल झाले.
मादी बिबट्या जवळपासच असण्याची शक्यता होती. तसेच ती चिडून आक्रमक होण्याची शक्यताही नाकारता येत नव्हती. त्यामुळे वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या सूचनेनुसार संबंधित तिन्ही बछड्यांचे आईसोबत मिलन घडवून आणण्याचा निर्णय घेण्यात आला. सायंकाळी साडेसहा वाजता तिन्ही बछडी क्रेटमध्ये ठेवण्यात आली. तसेच आसपास कॅमेरे लावून ठेवण्यात आले. कॅमेरा लावण्याचे काम सुरू असतानाच मादी बिबट्याचे त्याठिकाणी दर्शन झाले. त्यामुळे वनाधिकाऱ्यांनी तातडीने कॅमेरे बसविले. तसेच ते तेथून लांब अंतरावर जाऊन थांबले. काही वेळानंतर मादी बिबट्या त्याठिकाणी दाखल झाला. बिबट्याने तिन्ही पिलांना आपल्यासोबत नेले. मादीसह बछडी शिवारात सुरक्षितरीत्या दृष्टीआड झाल्यानंतर वनाधिकारी तेथून रवाना झाले.