कोल्हापूर : महाराष्ट्रसह विविध राज्यांत दरोडा, जबरी चोऱ्याचा धुमाकूळ घालणाऱ्या अहमदाबादच्या चौघा अट्टल गुन्हेगारांच्या आंतरराज्य टोळीचा जुना राजवाडा पोलिसांनी पर्दाफाश केला. तिघांना पोलिसांनी जेरबंद केले तर एक जण साथीदार पळून गेला. टोळीने सोमवारी (दि. १२) गुजरी परिसरात मोपेडच्या डिक्कीतील ४० हजार रुपयांची चांदी लुटल्याचे निष्पन्न झाले.दीपक धिरूबाई बजरंगे (वय ४९), मयूर दिनेश बजरंगे (३३), सुजित नारजी इंद्रेकर (५०) अशी अटक केलेल्यांची नावे असून साथीदार दशरथ ऊर्फ काल्या बाबू बजरंगे (सर्व रा. कुबेरनगर, अहमदाबाद, राज्य गुजरात) हा पसार झाला.पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, येथील गुजरी परिसरात सोमवारी अज्ञाताने दुचाकीच्या डिक्कीतील ४० हजारांची कच्ची चांदी चोरली होती. त्याचे सीसीटीव्ही फुटेज जुना राजवाडा पोलिसांना मिळाले. त्यानुसार पोलिसांनी पथक नेमून गुजरी परिरसरात आरोपींची शोधमोहीम सुरूच ठेवली. त्यावेळी कसबा गेड परिसरात थांबलेल्या चौघांच्या संशयास्पद हालचाली सुरू असल्याची माहिती पोलीस पथकास मिळाली. पोलिसांनी तातडीने जाऊन तिघांना पकडले; पण एक जण मोपेडसह पळून गेला. संशयितांना पोलीस ठाण्यात आणून चौकशी केली असता चांदी लुटीचा प्रकार उघडकीस आला. तिघांना न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.ही कारवाई पोलीस निरीक्षक दत्तात्रय नाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पो. नि. नागेश म्हात्रे, उपनिरीक्षक संदीप जाधव, पोलीस प्रशांत घोलप, सागर डोंगरे, सतीश बाबरे, परशराम गुजरे, गजानन परब, प्रतिम मिठारी आदींनी केली.महाराष्ट्रसह पाच राज्यात गुन्हेटोळीने महाराष्ट्रसह कर्नाटक, गुजरात, राजस्थान, तेलंगणा या पाच राज्यात दरोडे, जबरी चोर्या करुन धुमाकूळ घातला. संशयीतांवर २००९ पासून आजपर्यत पाचही राज्यात विवीध पोलीस ठाण्यात ४० हून अधिक गुन्हे दाखल आहेत.
कोल्हापूर: दरोडे, जबरी चोरी करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश; तिघे गजाआड, एक पसार
By तानाजी पोवार | Published: September 15, 2022 7:06 PM