उत्कर्षा पोतदार उत्तूर : सुळे ता. आजरा येथील एकाच कुटुंबातील तिघांचा गजरगाव येथील हिरण्यकेशी नदी पात्रात मंगळवार (ता. ७) रोजी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास अंघोळीसाठी गेले असता पाण्यात बुडून मृत्यू झाला. त्यामध्ये अरुण बचाराम कटाळे (वय -५५), उदय बचाराम कटाळे (वय - ५२) या सख्या भावांचा व जयप्रकाश अरुण कटाळे (वय -१३)या तिघांचा मृत्यू झाला. सुदैवाने ऋग्वेद अरुण कटाळे याला वाचवण्यात यश आले.याबाबत मिळालेली माहिती अशी, यात्रेनिमित्त कटाळे कुटुंबीय एकत्र कपडे धुण्यासाठी गजरगाव येथील हिरण्यकेशी नदीच्या बंधाऱ्याजवळ मंगळवार (ता. सात) रोजी सकाळी लवकर गेले होते. कपडे धुऊन झाल्यानंतर सर्वजण नदीमध्ये आंघोळीसाठी उतरले. बंधाऱ्यामधील पाणी खोल होते त्यामुळे त्यांना पोहताना पाण्याचा अंदाज आला नसल्याने सर्वजण पाण्यात बुडू लागले. त्यातच तिघांचा बुडून मृत्यू झाला. मात्र ऋग्वेद अरुण कटाळे याला वाचवण्यात यश आले. दोघांचे मृतदेह मिळाले असून जयप्रकाश अरुण कटाळे यांच्या मृतदेहाचा शोध सुरू आहे. यात्रा काळामध्ये ही घटना घडल्याने सुळे गावात एकाच कुटुंबातील तिघांच्या मृत्यूबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. अंकुश चव्हाण देवदूत म्हणून आला..
हारूर येथील तरुण अंकुश अशोक चव्हाण याला सर्वजण बुडताना दिसले. त्याने जीवाची पर्वा न करता बुडणाऱ्या ऋग्वेदला पाण्यातून काढून त्याला वाचवले. एका देवदूता सारखे येऊन त्याला ऋग्वेदला वाचवण्यात यश आलेतिघेही पोहणारे असूनही पाण्यात बुडाले.. गजरगाव येथील हिरणकेशी नदीवरील बंधाऱ्याच्या खालील बाजूस पाणी भरपूर असल्याने सर्वांना पाण्याच्या खोलीचा अंदाज आला नाही. तिघेही पोहणारे असूनही तिघांचा यात बुडून मृत्यू झाला.