कोल्हापूर : सुनेला व आजारी तीन महिन्यांच्या नातीला बाहेरून दूधपावडर आणि औषधे आणण्याचा खर्च पेलवत नसल्याच्या रागातून एकुलत्या नातीचा गळा आवळून खून केल्याची हृदयद्रावक घटना यादवनगरमध्ये शनिवारी (दि. ६) उघडकीस आली. शिफाना शब्बीर मुल्ला (वय ३ महिने) असे मृत बालिकेचे नाव आहे. या प्रकरणी राजारामपुरी पोलिसांनी आजी मोहबतबी आदम मुल्ला (वय ४५) हिला अटक केली.अधिक माहिती अशी, यादवनगर येथील एम. एस. ई. बी. रोड, कोटीतीर्थ वसाहत, एच. बिल्डिंगच्या दुसऱ्या मजल्यावर दोन खोल्यांच्या घरात संशयित मोहबतबी मुल्ला, त्यांचा मुलगा शब्बीर मुल्ला, सून शहनाज, साठ वर्षांची आई असे चौघेजण राहतात. शब्बीर हा फुलेवाडी येथे फॅब्रिकेशनचा व्यवसाय करतो. त्यांना तीन महिन्यांपूर्वी मुलगी झाली. तिचे नाव शिफाना ठेवले. साडेआठ महिन्यांमध्ये प्रसूती झाल्याने शिफाना प्रकृतीने कमजोर होती. सासू मोहबतबी ही सून शहनाजला तुझे दूध कमी झाले आहे. तुला खायला घालून काय उपयोग, मुलगा शब्बीर याचे आम्ही दुसरे लग्न करणार आहोत असे म्हणून घालून-पाडून बोलत होती.गेल्या तीन चार दिवसांपासून बालिका शिफाना हिला सर्दी व ताप असल्याने नणंद काजल अब्दुलरशीद नेरली व शेजारील महिलेला घेऊन ती राजारामपुरी सातवी गल्ली येथील एका दवाखान्यात घेऊन गेली होती. तेथून परत आल्यानंतर सासू पुन्हा बोलू लागली. मुलगीला बरे नसल्याने शब्बीर तीन दिवस कामावर गेला नाही. ५ आॅक्टोबरला रात्री साडेनऊच्या सुमारास बालिका साडीच्या झुल्यात झोपली होती. ६ आॅक्टोबरला सकाळी शहनाज मुलीला दूध पाजून बिल्डिंगच्या खाली पिण्याचे पाणी भरण्याकरिता गेली. मुलगी झुल्यात खेळत होती. नंतर ती अंघोळीकरिता बाथरूममध्ये गेली. त्यानंतर शब्बीर हे मुलीला हातामध्ये घेऊन काय झाले, ती उठत का नाही असे म्हणत बाहेरील खोलीत आले. शहनाज हिने पाहिले असता शिफान निपचित पडली होती. तिच्या गळ्यावर जखमेचा व्रण व त्यावर शाई लावलेली दिसली. शाई कोणी लावली असे तिने विचारले असता सासूने आपण लावल्याचे सांगितले. त्यानंतर पती शब्बीर व सासू मोहबतबी हे सीपीआर रुग्णालयात घेऊन गेले. या ठिकाणी बालिका मृत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. बालिकेचे बागल चौक येथील स्मशानभूमीत दफन केले.पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्नशवविच्छेदन विभागात बालिकेला आणल्यानंतर डॉ. निखिल जगताप आणि डॉ. गुरुनाथ दळवी, डॉ. वसीम मुल्ला यांना शंका आली. त्यांनी राजारामपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक औदुंबर चव्हाण यांना बोलावून घेतले. त्यांना हा नैसर्गिक मृत्यू नसून खून असल्याचे सांगितले. त्यानंतर खुनाला वाचा फुटली. याप्रकरणी सखोल चौकशी केली असता आजी मोहबतबी हिने आर्थिक विवंचनेतून खुनाची कबुली दिली.
तीन महिन्यांच्या नातीचा आजीकडून खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 08, 2018 12:47 AM