कोल्हापूर : कोल्हापूर शहरासह उपनगरांत रस्त्यावरून चालत जाणाऱ्या महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने जबरदस्तीने हिसडा मारून लंपास करणाऱ्या वाळवा तालुक्यातील तिघा अट्टल चेन स्नॅचरना पोलिसांनी अटक केली. संशयित नीकेश ऊर्फ बबलू नारायण वडार (वय २३, रा. माळभाग, नेर्ले, ता. वाळवा, जि. सांगली), सचिन श्रीकांत हिंगणे (२९, रा. बांबवडे, ता. वाळवा), सुनील मोहन रनखांबे (२२, रा. नागेवाडी गल्ली, नेर्ले, ता. वाळवा) अशी त्यांची नावे आहेत. त्यांनी २५ चेन स्नॅचिंग आणि २ घरफोड्या अशा २७ गुन्ह्यांची कबुली दिली आहे. त्यांच्याकडून १९ लाखांचे सोन्याचे दागिने, दोन दुचाकी हस्तगत केल्या आहेत, अशी माहिती पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.स्थानिक गुन्हे शाखेचे कॉन्स्टेबल संतोष माने यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, कोल्हापूर शहरासह आजूबाजूच्या परिसरात रस्त्यावरून चालत जाणाºया महिलांच्या गळ्यांतील सोन्याचे दागिने जबरदस्तीने हिसडा मारून चोरी करणारा टोळीप्रमुख नीकेश वडार हा कोल्हापुरातील सह्याद्री हॉटेलजवळ येणार आहे. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक दादाराजे पवार व त्यांच्या पथकाने २१ जूनला हॉटेल परिसरात सापळा लावून वडारला अटक केली. त्याच्याकडे चौकशी केली असता, सचिन हिंगणे व सुनील रनखांबे यांच्या मदतीने दुचाकीचा (एम. एच. १० सी. झेड ८१०३) वापर करून एकूण १२ गुन्हे केल्याची कबुली दिली.
महिलांच्या गळ्यांतील सोन्याचे दागिने रनखांबे याच्यातर्फे विक्री करून त्यातून मिळालेले पैसे तिघांनी वाटून घेतले. त्यानंतर हिंगणे व रनखांबे यांना अटक केली असता, १३ गुन्ह्यांची कबुली दिली. संशयितांकडून शाहूपुरी सहा, राजारामपुरी तीन, जुना राजवाडा दोन, वडगाव चार, करवीर तीन, शाहूवाडी पाच, जयसिंगपूर दोन, शिरोळ एक, कोडोली एक असे २७ गुन्हे उघडकीस आले आहेत. पोलीस निरीक्षक तानाजी सावंत तपास करीत आहेत.