कोल्हापूर : विचारेमाळ येथील विभागीय जातपडताळणी कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बनावट सह्या करून जातवैधता प्रमाणपत्र देऊन फसवणूक केल्याप्रकरणी कार्यालयातील लिपिकासह तिघांना बुधवारी पोलिसांनी अटक केली. संशयित लिपिक अनिल हरिहर ढवळे (वय ३९, रा. भगवा चौक, कसबा बावडा), कंत्राटी कामगार सलीम मौला शेख (२८, रा. लाईन बझार, कसबा बावडा) व पंटर विशाल विठ्ठल पाटील (३३, रा. उजळाईवाडी), अशी त्यांची नावे आहेत. त्यांना न्यायालयात हजर केले असता दि. १६ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. या प्रकरणाची व्याप्ती वाढली असून, पोलीस कसून शोध घेत आहेत. विभागीय जातपडताळणी कार्यालयातून बोगस सह्यांद्वारे जातवैधता प्रमाणपत्र देणाऱ्या रॅकेटचा शाहूपुरी पोलिसांनी छडा लावला होता. या प्रकरणात मुख्य सूत्रधार समीर जमादार, त्याचा साथीदार बाळासाहेब ऊर्फ प्रशांत हारगे व कार्यालयातील लिपिक अनिल ढवळे या तिघांना अटक केली होती. हे तिघेही जामिनावर बाहेर होते. दरम्यान, २३ जानेवारी २०१३ मध्ये कंत्राटी सहायक लिपिक विशाल पाटील याने लखन मोहन सावंत यांच्या जातपडताळणी अर्जावर सचिव, सदस्य व अध्यक्षांच्या खोट्या सह्या करून त्यांना जातवैधता प्रमाणपत्र दिल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट होताच कार्यालय क्रमांक दोनचे उपायुक्त तथा सदस्य सुनील वारे यांनी लिपिक पाटील याच्या विरोधात शाहूपुरी पोलिसांत तक्रार दिली. तपास अधिकारी विद्या जाधव यांनी त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याने साथीदार सलीम शेख व अनिल ढवळे यांच्या मदतीने आपण बनावट प्रमाणपत्र देत असल्याची कबुली दिली. त्यानुसार पोलिसांनी शेख व ढवळे यांनाही अटक करून त्यांच्याकडून दहा बोगस प्रमाणपत्रे जप्त केली. अद्याप सुलोचना हरी सुतार, शुभम सोमशेखर मठ, बाळासो रामू बनसोडे यांनाही बनावट प्रमाणपत्र दिल्याचे स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी अधिक तपास जाधव करीत आहेत. (प्रतिनिधी)पाच हजारांत प्रमाणपत्र जातवैधता प्रमाणपत्राची कामे घेण्याचे काम पंटर सलीम शेख व अनिल ढवळे हे दोघे करीत असत. काम करून देतो म्हणून ते सुरुवातीस अर्जदाराकडून पाच हजार रुपये घेत होते. अशी त्यांनी शेकडोच्या वर प्रमाणपत्र दिल्याचे समजते. पंटर शेख याचे वडील सेवानिवृत्त सहायक फौजदार आहेत. त्यामुळे त्याचे गैरकाम करण्याचे धाडस वाढले होते.
जातवैधता बोगस प्रमाणपत्रप्रकरणी तिघांना अटक
By admin | Published: February 12, 2015 12:47 AM