कोल्हापूर : पुण्यातील बांधकाम व्यावसायिक डी. एस. के.गु्रपचे मालक संशयित डी. एस. कुलकर्णी यांच्यासह पत्नी हेमंती, मुलगा शिरीष या तिघांचा येरवडा कारागृहातून कोल्हापूर पोलिसांनी सोमवारी ताबा घेतला. त्यांना आज, मंगळवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे. कोल्हापुरातून सुमारे १९ कोटींची फसवणूक असून आतापर्यंत ३०० गुंतवणूकदारांचे पोलिसांनी जबाब घेतले आहेत.
बांधकाम व्यावसायिक डी. एस. के.यांच्या विरोधात मुंबई, पुणे, कोल्हापूर अशा तिन्ही ठिकाणी गुन्हे दाखल आहेत. पुणे व कोल्हापूर पोलिसांनी आतापर्यंत डी.एस.कें.च्या ५०० मालमत्ता सील केल्या आहेत. जिल्ह्यातील सहाशे गुंतवणूकदारांनी डीएसके ग्रुपमध्ये दोनशे कोटी रुपये गुंतविले आहेत. त्यापैकी ३०० जणांनी पोलिसांत तक्रारी दिल्या आहेत. आतापर्यंत फसवणुकीचा आकडा १९ कोटींचा आहे.सोमवारी रात्री उशिरा या तिघांना सशस्त्र पोलीस बंदोबस्तात मुख्यालयात आणले. त्यांची मध्यरात्री सीपीआर रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली. आज, मंगळवारी त्यांना न्यायालयात हजर केले जाणार आहे.