लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : अरुणाचल परिवहन आयुक्तांनी नोंदणी रद्द केलेल्या २४०० बसेसपैकी ३ आरामबस कोल्हापूर प्रादेशिक परिवहन कार्यालयाने राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवर ताब्यात घेतल्या. ही कारवाई प्रादेशिकच्या अंमलबजावणी पथकाने केली. प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या अंमलबजावणी पथकाने अरुणाचल परिवहन आयुक्तांनी तेथील २४०० आराम बसेसची विविध त्रुटींबाबत नोंदणी रद्द केली होती. त्याबद्दल देशातील सर्व परिवहन आयुक्तांना रितसर पत्र दिले होते. त्यानुसार या बसेसमधील तीन बसेस प्रादेशिक परिवहनच्या अंमलबजावणी पथकाच्या निदर्शनास गुरुवारी आल्या. यावेळी रितसर तपासणी व सूचनेनुसार या बसेस ताब्यात घेतल्या. ताब्यात घेतलेल्या बसेसमध्ये बस क्रमांक (एआर-०२-५७३३), (एआर-२०-६६६६), (एआर- ११ ए- ११००) असे आहेत. यातील तिरूमला कॅब्स कंपनीच्या मालकाने गुवाहाटी उच्च न्यायालयातून कारवाईला स्थगिती आणली आहे. त्याबाबतची कागदपत्रे त्यांनी गुरुवारी डॉ. डी. टी. पवार यांच्याकडे सादर केली. स्कूल बसवरही बडगा शासनाच्या निर्देशानुसार विद्यार्थ्यांचा घर ते शाळेपर्यंतचा प्रवास सुरक्षित व्हावा, याकरिता राज्यातील स्कूल बसेसची तपासणी शाळा सुरू होण्यापूर्वीच करून घेण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार जिल्ह्यातील ७०६ बसेसपैकी ३७५ बसची तपासणी त्या-त्या मालकांनी करून घेतली आहे, तर उर्वरित ३३१ स्कूल बसेस अद्यापही तपासणी करून घेतलेली नाही. अशा बसमालकांवर ‘परवाना निलंबन का करू नये’ अशा प्रकारच्या नोटिसा बजावल्या जातील, असेही प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. पवार यांनी स्पष्ट केले.
तीन आरामबस ताब्यात
By admin | Published: June 16, 2017 11:47 PM