कोल्हापूर : शहरातील रिकाम्या मैदानांवर रात्री सुरू असणाºया विविध ‘ओपन बार’वर पोलिसांनी छापे टाकले. शुक्रवारी रात्री अचानक पडलेल्या धाडीने खुलेआम दारू ढोसत बसलेल्या तळीरामांनी कारवाईच्या भीतीने धूम ठोकली; तर सिद्धार्थनगर कमानीजवळ अंधारात उघड्यावर दारू पीत बसणाºया तिघांना लक्ष्मीपुरी पोलिसांनी अटक केली.
संशयित वैभव दीपक लिगाडे (वय २९), गणेश दगडू कांबळे (२९), आशिष नंदकुमार बनगे (२६, तिघे रा. सिद्धार्थनगर, कोल्हापूर) अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्या ताब्यातून दारूच्या बाटल्या, ग्लास जप्त केला.
शहरातील खेळांची मैदाने ओपन बार बनली आहेत. मैदानावर दारूच्या रिकाम्या बाटल्या फोडल्यामुळे खेळाडूंना व फिरण्यासाठी येणाºया नागरिकांना त्याचा त्रास होतो आहे. शहरात फोफावलेल्या ओपन बार, मटका, जुगार यांसह अवैध धंद्यांवर कारवाई करावी, अशी मागणी सर्वपक्षीय नागरी कृती समितीने विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांच्याकडे केली होती. त्यानुसार नांगरे-पाटील यांनी शहरातील खेळांची, शाळांची मैदाने, रस्त्यांचे पदपथ, पर्यटनस्थळी दिवस-रात्र सुरू असणाºया ओपन बारवर खुलेआम दारू ढोसत बसलेल्या तळीरामांना ठोकून काढा, असे आदेश पोलिसांना दिले.
जुना राजवाडा, लक्ष्मीपुरी, शाहूपुरी, राजारामपुरी या चार पोलीस ठाण्यांतील गुन्हे शाखेचे कर्मचारी शुक्रवारी रात्री बाहेर पडले. पंचगंगा घाट, ब्रह्मपुरी, शिवाजी स्टेडियम, गांधी मैदान, तपोवन, पेटाळा मैदान, रंकाळा खणीकडील मागील बाजू, जुना वाशी नाकाजवळील रिकामी जागा, पुईखडी, ताराराणी विद्यालय (मंगळवार पेठ), ब्रह्मपुरी, शाहू दयानंद हायस्कूल मैदान, हॉकी स्टेडियम (ध्यानचंद स्टेडियम), आदी ठिकाणांची झाडाझडती घेतली.
पोलीस आल्याचे पाहून तळीराम अंधाराचा फायदा घेत पसार झाले; तर सिद्धार्थनगर येथील कमानीजवळ अंधारात वैभव लिगाडे, गणेश कांबळे, आशिष बनगे असे तिघेजण दारू पीत बसले होते. लक्ष्मीपुरीचे गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक दादाराव पवार यांनी या ठिकाणी छापा टाकून त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्यावर मुंबई दारूबंदी कायदा कलम ६६ (ब) प्रमाणे कारवाई केली.
ड्रंक अॅँड ड्राइव्ह
ओपन बारवरील कारवाईदरम्यान शहरातील महत्त्वाच्या चौकांत नाकाबंदी करून ड्रंक अॅँड ड्राइव्ह मोहीम राबविण्यात आली. यावेळी वाहनातील गॅस किटच्या तपासणीसह लायसेन्स, वाहनांची कागदपत्रेतसेच मद्यपान करून वाहन चालविणाºयांची ब्रेथ अॅनालायझर यंत्राद्वारे तपासणी केली गेली. यावेळी शिवाजी पूल येथे वैभव बबन कांबळे (३०, रा. कनाननगर) हा मद्यपान करून दुचाकी चालवीत असताना आढळून आला.