कोल्हापूर : शाईन मल्टिट्रेड इंडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या संचालक, प्रतिनिधी अशा तिघांना विशेष न्यायालयाने गुरुवारी दोषी ठरवले. तिघांना सात वर्षे कारावासाची शिक्षा आणि प्रत्येकी एक लाखाचा दंड ठोठावला. आनंद शिवराम तांबे (वय ४९, रा. कल्याण ठाणे), भूपसिंग सुरग्यानसिंग (४०, रा. दिल्ली) आणि मोहन अर्जुन केसवाणी (वय ५९, रा. जयपूर) अशी शिक्षा झालेल्या तिघांची नावे आहेत. आकर्षक परताव्याच्या आमिषापोटी महिलांची फसवणूक केल्याप्रकरणी ही शिक्षा दिली. सरकार पक्षातर्फे साहाय्यक सरकारी वकील समीउल्ला पाटील यांनी काम पाहिले.
खटल्याची पार्श्वभूमी अशी, जयपूर येथील शाईन मल्टिट्रेड इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने ९९०० रुपये भरून ठरावीक कालावधीनंतर ६००, १२००, २४०० अशा पटीत परतावा देण्याचे आमिष दाखविले होते. कंपनीच्या कोल्हापूर शहरातील प्रतिनिधी सुनील घाडगे व आनंद तांबे यांनी पुढाकार घेत शहरातील १२५ हून अधिक महिलांकडून २००९ ते २०१२ या कालावधीत मोठ्या रकमा घेतल्या. प्रारंभी काही गुंतवणूकदारांना परताव्यापोटी काही रक्कमही दिली. त्यानंतर कंपनीकडून पैसे परत करण्यास टाळाटाळ सुरू केली. गुंतवणूकदारांनी कंपनीविरोधात लक्ष्मीपुरी पोलिसांत गुन्हा दाखल केला. दरम्यानच्या कालावधीत कंपनीचा प्रतिनिधी सुनील घाडगे याचा मृत्यू झाला.
खटल्याची सुनावणी विशेष न्यायाधीश बी. डी. शेळके यांच्या न्यायालयात सुरू झाली. सरकार पक्षातर्फे साहाय्यक सरकारी वकील समीउल्ला पाटील यांनी १४ साक्षीदार तपासले. गुंतवणूकदार महिलांच्या साक्षी महत्त्वपूर्ण ठरल्या. न्यायालयाने दोन्ही बाजूंच्या युक्तिवादानंतर तांबे, भूपसिंग व केसवाणी या तिघांना दोषी ठरविले. या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेचे तत्कालीन पोलीस निरीक्षक ए. ए. बोडके यांनी केला. सरकार पक्षाला ॲड. सनी शिर्के, ॲड. सुमित प्रभावळे, लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याचे कॉन्स्टेबल साताप्पा कळंत्रे व साहाय्यक फौजदार एम. एम. नाईक यांचे सहकार्य मिळाले.
(तानाजी)