कोल्हापूर : शनिवार पेठेतील साळी गल्लीत अपार्टमेंट बांधकामासाठी पायाखुदाईचे काम सुरू असताना शेजारील तीन मजली इमारत कोसळण्याची दुर्घटना आज शुक्रवारी सकाळी नऊ वाजता घडली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली. एखाद्या पत्त्याच्या पानांसारखी ही इमारत कोसळली. त्यामुळे नागरिक सैरावैरा पळाले. आम्ही रस्त्यावर आलो...सन २०१० ला १२ ते १३ लाख रुपये खर्चून ही इमारत बांधली आहे. आमचा चांदीचा व्यवसाय आहे. सहा महिन्यांपासून आमच्या शेजारी असलेली जुनी घरे पाडून याठिकाणी अपार्टमेंट बांधण्यात येणार आहे. त्यासाठी पाया खोदण्याचे काम सुरू होते. शुक्रवारी पहाटे इमारत हलू लागली, याची चाहूल लागताच प्रकाश काजवे यांनी विकासक करण माने यांना हा प्रकार सांगितला. माने हे काजवे यांच्या घराजवळ आले. ‘इमारतीला काय होत नाही,’ असे सांगून ते निघून गेले. त्यानंतर सकाळी काजवे कुटुंबीयांना पुन्हा इमारत हलण्याची चाहूल लागली. त्यांना धोका वाटल्याने घरातील साहित्य बाहेर काढण्याचा प्रयत्न केला पण कमी वेळ असल्याने आम्ही सर्वजण घराबाहेर आलो व काही क्षणांतच त्यांची इमारत ढासळली. चांदी तयार करण्याचे मशीन, प्रापंचिक साहित्य व मुलांचे शिक्षणांचे साहित्य इमारतीखाली बेचिराख झाले.‘आम्ही रस्त्यावर आलो,’ असे अस्वस्थ होत सुजाता प्रकाश काजवे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.प्रकाश काजवे अस्वस्थ...मालक प्रकाश काजवे हे गेल्या आठवड्यापासून आजारी आहेत. गुरुवारी (दि. २१) त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. शुक्रवारी स्वत:च्या डोळ्यांदेखत इमारत ढासळली. या घटनेनंतर त्यांना त्रास जाणवू लागला व ते अस्वस्थ झाले. पत्नी, मुलगा व मुलगी या तिघांनी त्यांना आपल्या नातेवाईकांकडे पाठविले.शेजारच्या घरांनाही धक्का...याठिकाणी एक-दोन जुनी घरे आहेत. पाया खोदण्याचे काम सुरू असल्याने बोळातील रस्त्याला तडे गेले आहेत. जेसीबीने माती काढत असताना आमची घरे हलतात, असे नागरिकांनी पोलिसांना सांगितले.महापालिकाही तितकीच जबाबदार...महापालिकेने या विकसकाला जमिनीपासून सुमारे दहा फूट खुदाई करण्यास मान्यता दिली आहे; पण, ही केलेली खुदाई दहा फुटांपेक्षा जास्त आहे. त्याचा पाहणी करण्याची जबाबदारी महापालिका प्रशासनाची असते. या दुर्घटनेला विकसकाबरोबर महापालिकाही तितकीच जबाबदार असल्याच्या भावना नागरिकांनी यावेळी व्यक्त केल्या.लोकप्रतिनिधींकडून पाहणीशनिवार पेठेत इमारत ढासळल्याचे समजताच सकाळी खासदार धनंजय महाडिक, आमदार राजेश क्षीरसागर, अमल महाडिक, महापौर अश्विनी रामाणे, उपमहापौर शमा मुल्ला, नगरसेवक किरण शिराळे, माजी स्थायी समिती सभापती नंदकुमार मोरे, काँग्रेसचे नगरसेवक शारंगधर देशमुख आदींनी घटनास्थळी भेट दिली. यावेळी स्थानिक नागरिकांनी प्रकार कसा झाला, याची महिती त्यांना दिली. यावेळी शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, नगररचनाकार धनंजय खोत यांच्यासह महापालिकेचे उपशहर अभियंता, आदी उपस्थित होते.लक्ष्मीपुरी पोलिसांची तत्परता; अग्निशमन तत्काळशनिवार पेठेत इमारत ढासळली समजताच शहर पोलीस उपअधीक्षक भारतकुमार राणे, पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक हरिदास घोलप, पोलीस कर्मचारी घटनास्थळी आले. त्यापाठोपाठ महापालिकेच्या अग्निशमन दलाचे जवान बंब घेऊन याठिकाणी आले. दुपारनंतर पोलिसांबरोबर अग्निशमन दलाचे जवान बेचिराख झालेले साहित्य बाहेर काढत होते.जुन्या इमारतींची तपासणी करून घ्याकोल्हापूर : शहरातील कोणतीही इमारत किंवा घरांना आकस्मिक धोका निर्माण होऊन कोसळण्याची शक्यता आहे, अशा घरात नागरिकांनी न राहता संबंधित घराची तपासणी करून आवश्यक तेनुसार दुरुस्ती करून घ्यावी, असे आवाहन महानगरपालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी निवेदनाद्वारे केले आहे. याबाबत आयुक्तांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, शहरातील इमारती व घरांना अचानक धोका निर्माण होऊन इमारत अचानक कोसळते, असे निदर्शनास आले आहे. अशा धोक्याच्या घरांपासून त्यामध्ये राहणाऱ्या व आसपास राहणाऱ्या नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. तो टाळण्याच्या दृष्टीने जुन्या घरांची तपासणी करून घेणे आवश्यक आहे. अशा धोकादायक इमारती व त्यावरील त्याचा धोक्याचा भाग उतरून घेण्यासाठी महापालिकेच्या चारही विभागीय कार्यालयांकडे स्वतंत्र उपविभाग कार्यरत आहेत. धोकादायक इमारत किंवा घराची वेळोवेळी स्ट्रक्चरल इंजिनिअरकडून तपासणी करून घेणे ही जबाबदारी घरमालकाची आहे. याबाबतची लेखी माहिती कोणीही नागरिकाने महापालिकेच्या मुख्य इमारतीमधील शहर अभियंत्यांच्या कार्यालयात दिल्यास या इमारतीची पाहणी करून शक्य त्या उपाययोजना महानगरपालिकेकडून करण्यात येईल, असे निवेदनात म्हटले आहे.महापालिकेचा खुलासा करण माने असोसिएटस्तर्फे करण माने यांना १४/०८/२०१५ रोजी बांधकाम परवानगी देण्यात आली. जमीन पातळीचे वर १.२० मीटर व जमीन पातळीचे खाली १.२० मीटर खुदाईला अनुमती देण्यात आली होती. खुदाई करतेवेळी धोका निर्माण झाल्यास अथवा शेजारच्या इमारतींचे नुकसान झाल्यास त्याची जबाबदारी विकासकावर राहील असा हमीपत्र घेण्यात आले आहे. अनुज्ञेय असलेल्या खुदाईपेक्षा ४ ते ६ मीटरची खुदाई झालेली आहे. काजवे यांची इमारत कोसळण्यास पूर्णत: करण माने जबाबदार आहेत. काजवे यांच्या लगतच्या चव्हाण यांच्या इमारतीसाठी दक्षतेच्या सूचना दिल्या आहेत. विकासकाचा हलगर्जीपणा का नडला१ विकासक करण माने यांनी इमारत बांधकामासाठी आॅगस्ट २०१५ मध्ये परवानगी घेतली, परंतु खुदाईसाठी परवानगी घेतली नव्हती. २ एमआरटीपी अॅक्टनुसार गावठाण परिसरात बेसमेंटकरीता ८ फूट (२.५ मीटर) खुदाई अनुज्ञेय असताना या कामाच्या ठिकाणी तब्बल २० फूट खुदाई केली आहे. ३ खुदाई सुरू करण्यापूर्वी रितसर मनपा सर्वेअरकडून कामाची लाईन घ्यावी लागते, ती घेण्यात आली नाही. ४ जेथे खुदाई सुरू होती, ती जमीन भुसभुशीत पांढऱ्या मातीची असल्याने खबरदारी घेणे आवश्यक असताना ती घेतली नाही. ५ खुदाईकरीता मोठ्या शक्तीची मशिनरी वापरली गेल्याने जमिनीसह इमारतींना हादरे बसले तरीही त्याकडे दुर्लक्ष झाले.६ प्रकाश काजवे यांनी वारंवार सांगूनही त्याकडे दुर्लक्ष करत प्रमाणापेक्षा अधिक खुदाई केली. ७ भुसभुशीत माती असताना खुदाईवेळी शेजारच्या इमारतीला धोका पोहोचणार नाही याची खबरदारी घेतली नाही. महापौरांची घटनास्थळी भेटमहापौरांनी घटनास्थळी भेट दिली त्यावेळी अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, नगररचना विभागाचे सहायक संचालक धनंजय खोत, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. माने यांनी इमारत बांधकाम करण्यासाठी परवानगी घेतली होती का तसेच खुदाई करण्यापूर्वी परवानगी घेतली होती का, हेही तपासून पाहावे, अशा सूचना महापौरांनी केल्या. काजवे कुटुंबीय व शेजारील चव्हाण कुटुंबीयांची राहण्याची पर्यायी व्यवस्था करण्याच्या सूचनाही महापौरांनी दिल्या. दु:खद आठवणींना उजाळा...२५ वर्षांपूर्वी शनिवार पेठेतील साळी गल्लीत एका इमारतीचे बांधकाम सुरू असताना गॅलरीचा भाग कोसळून दोन मैत्रिणी मृत झाल्या होत्या. त्यावेळचे दृश्य अंगावर शहारे आणणारे होते,अशा दु:खद आठवणीला नागरिक उजाळा यावेळी देत होते. कोल्हापुरातील शनिवार पेठेत प्रकाश मोहन काजवे यांच्या मालकीची तीन मजली सिमेंट काँक्रिटची इमारत शुक्रवारी सकाळी शेजारील सुरू असलेल्या अपार्टमेंटच्या पायाखुदाई करण्यात आलेल्या खड्ड्यात पडली. सुदैवाने काजवे कुटुंबीय इमारतीतून वेळीच बाहेर पडल्याने सुरक्षित राहिले.
तीन मजली इमारत कोसळल्याने खळबळ
By admin | Published: January 23, 2016 12:59 AM