कोल्हापूर : राज्य सरकारने कृषी पतपुरवठा करणाऱ्या संस्थांच्या सबलीकरणासाठी स्थापन केलेल्या त्रिस्तरीय समितीची चौथी बैठक कोल्हापुरात झाली. ‘नाबार्ड’चे माजी अध्यक्ष डॉ. यशवंतराव थोरात यांच्या अध्यक्षतेखालील समितीने वर्धा, नागपूर, बुलढाणा जिल्हा बॅँकांचा आढावा घेतला.राज्यात शेतकऱ्यांना पीककर्जाचे वाटप नाबार्ड, जिल्हा बॅँक व विकास संस्थांच्या माध्यमातून केले जात आहे; पण राज्यात अनेक जिल्हा बॅँका, विकास संस्था आतबट्ट्यात आल्याने शेतकºयांना पीक कर्जपुरवठा होत नाही. परिणामी शेतकऱ्यांना खासगी सावकारांच्या आश्रयाला जावे लागते. शेतकरी खासगी सावकारांच्या पेचात अडकला तर तो बाहेरच येऊ शकत नाही. त्यामुळे ही त्रिस्तरीय यंत्रणा सक्षम करण्यासाठी राज्य सरकारने ‘नाबार्ड’चे माजी अध्यक्ष डॉ. यशवंतराव थोरात यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे.या समितीने, राज्यातील १४ जिल्हा बॅँका अडचणीत आहेत. त्या बॅँकांचे ‘अ’, ‘ब’ व ‘क’ असे वर्गीकरण केले आहे. प्राधान्याने ‘क’ वर्गातील बॅँकांच्या सबलीकरणासाठीही समितीचा तातडीने उपाययोजना सुचविण्याचा प्रयत्न आहे. ‘क’ वर्गात ‘वर्धा’, ‘बुलढाणा’ आणि ‘नागपूर’ जिल्हा बॅँकांचा समावेश आहे.
या तिन्हींत ‘वर्धा’ बॅँकेची अवस्था फारच नाजूक आहे. या बॅँकेचा एनपीए ९९ टक्के, तर ‘नागपूर’ व ‘बुलढाणा’ बॅँकांचा ४८ टक्के असल्याने या बॅँकांना बाहेर काढण्याचे आव्हान सरकारसमोर आहे. येथील शेतकरी थेट सावकाराकडून कर्ज उचलत असल्याने तो कर्जाच्या खाईत अडकला आहे.त्रिस्तरीय समितीने या तिन्ही जिल्हा बॅँकांना भेट देऊन अभ्यास केला. त्यानंतर शनिवारी कोल्हापूर जिल्हा बॅँकेत या समितीची बैठक झाली. या बैठकीत प्रामुख्याने या तिन्ही जिल्हा बॅँका व तेथील अडचणीतील पतपुरवठा संस्थांना ऊर्जितावस्थेत आणण्यासाठी काय उपाययोजना करता येतील, याबाबत चर्चा झाली.
या बैठकीत झालेल्या चर्चा आणि उपाययोजनांबाबत समितीचे सदस्य लवकरच मुख्यमंत्री, राज्याचे सचिव व राज्य सहकारी बॅँकेच्या अध्यक्षांची भेट घेणार आहेत. बैठकीला डॉ. थोरात यांच्यासह समितीचे सदस्य, राज्याचे सेवानिवृत्त अप्पर निबंधक दिनेश ओऊळकर, सेवानिवृत्त विभागीय सहनिबंधक (लेखापरीक्षण) ए. डी. चौगले, पुणे जिल्हा बॅँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रतापसिंह चव्हाण, जिल्हा उपनिबंधक अरुण काकडे, जिल्हा बॅँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ए. बी. माने, जिल्हा बॅँकेचे संचालक अनिल पाटील, असिफ फरास, उदयानी साळुंखे, आदी उपस्थित होते.