कोल्हापूर : जोतिबाहून पन्हाळ्याला येत असताना दानेवाडी घाट येथे सांगली शिक्षण संस्थेच्या इंदिराबाई भिडे कन्या विद्यालय, विटा येथील सहलीच्या एस. टी. बसचा ब्रेक निकामी झाल्याने चालकाने रस्त्याच्या कडेला असलेल्या कठड्याला बस धडकविली. त्यामध्ये बस चरीमध्ये एका बाजूला उलटून ११ विद्यार्थिनी आणि तीन शिक्षक जखमी झाले. या सर्वांना तत्काळ सीपीआर रुग्णालयात दाखल केले. मंगळवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली. चालकाच्या डाव्या बाजूला १०० फूट खोल दरी होती. त्यांनी वेळीच उजव्या बाजूला बस कठड्याला धडकवून चरीमध्ये घातल्याने मोठा अनर्थ टळला.
अधिक माहिती अशी, सांगली शिक्षण संस्थेच्या इंदिराबाई भिडे कन्या प्रशाला शाळेने पन्हाळा, जोतिबा आणि कणेरी मठ अशी एक दिवसाची सहल आयोजित केली होती. तीन बसमधून विद्यार्थिनी व शिक्षक मंगळवारी पहाटे कोल्हापूरला येण्यासाठी निघाले. सकाळी जोतिबा डोंगरावर सर्वजण आले. दर्शन घेऊन येथून तिन्ही एस. टी. बसेस नागमोडी वळणाच्या घाटरस्त्याने पन्हाळ्याकडे जात होत्या. एस.टी. बस (एमएच ४०-२८२३) मध्ये ५० विद्यार्थिनी होत्या. दानेवाडी येथे घसरतीला येताच या बसचा ब्रेक अचानक निकामी झाला. त्यामुळे चालकाने प्रसंगावधान राखून रस्त्याकडेला असलेल्या कठड्याला बस धडकविली. त्यामुळे बस एका बाजूला कलंडली. अपघातामध्ये एकमेकांच्या अंगावर, आजूबाजूला मुली फेकल्या गेल्याने कोणाच्या डोक्याला, हाता-पायाला गंभीर दुखापत झाली. भेदरलेल्या मुलींचा आक्रोश ऐकून स्थानिक नागरिक व वाहनधारकांनी मदतीसाठी धाव घेत तातडीने रुग्णवाहिकेतून त्यांना ‘सीपीआर’मध्ये दाखल केले.
अचानक रुग्ण दाखल झाल्याने येथील अपघात विभागातील डॉक्टर व परिचारिकांची धांदल उडाली. अपघाताची माहिती समजताच शासकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता मीनाक्षी गजभिये स्वत:हून उपस्थित होत्या. जखमींची संख्या जास्त असल्याने त्यांनी बाहेरून डॉक्टरांची कुमक मागविली. एका खाटेवर दोन विद्यार्थिनींना ठेवून त्यांच्यावर तातडीने उपचार केले.
आमदार सुमनताई पाटील यांच्याकडून विचारपूसतासगावच्या आमदार सुमनताई आर. पाटील या कोल्हापुरात काही कामानिमित्त आल्या होत्या. त्यांना अपघाताचे वृत्त समजताच त्यांनी ‘सीपीआर’ला भेट देत जखमींची विचारपूस केली.पालकांची घालमेलविद्यार्थ्यांच्या अपघाताची माहिती समजताच मिळेल त्या वाहनाने पालक सीपीआरमध्ये येत होते. यावेळी पालक ‘माझ्या मुलाला काय झाले ते बघू द्या,’ म्हणून आक्रोश करीत होते. मुलांवर उपचार केल्यानंतर त्यांना पाठीमागील वॉर्डमध्ये हलविण्यात येत होते. मुलांना काय झाले, कुठे लागले, या चिंतेत पालकांची घालमेल सुरू होती.जखमींची नावे अशीशिक्षिका कविता वैभव कुपाडे (३७, रा. विटा, खानापूर), गोविंद मधुकर धर्मे (३६, रा. देशिंग), स्वागत धर्मराज कांबळे (२८, रा. कागल), निमिषा विजय साळुंखे (१६, रा. मादळमुटी, जि. सांगली), अंजली निवास कांबळे (१५, रा. विटा सावरकर), पूजा किसन जगताप (१५, रा. भाग्यनगर), गौरी चंद्रकांत पाटील (१५), तन्मयी तुकाराम साठे (१५), पायल प्रमोद खांडेकर (१४), ज्योती सतीश सपकार (१५, सर्व, रा. विटा), इथिता तुकाराम यादव (१५, रा. नागेवाडी), सृष्टी सुनील जाधव (१५, रा. कारवे), प्रीती संभाजी मोरे (१५, रा. आम्रापूर), ऋतुजा शशिकांत जाधव (१५, रा. कार्वे).