कसबा तारळे : गेले चार दिवस कडक लॉकडाऊनमुळे घरी असणाऱ्या नागरिकांनी गुरुवारी पाचव्या दिवशी अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली खरेदीसाठी बाजारपेठेत फेरफटका मारण्यास सुरुवात केली. परिणामी कडक लॉकडाऊनने कोरोनाची साखळी तोडण्याच्या प्रशासनाच्या प्रयत्नांना नागरिकांसह काही उतावीळ व्यापाऱ्यांनी आव्हान दिल्याचे दिसत आहे.
गेल्या पंधरा दिवसांपासून जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. तर, दररोज सरासरी पन्नासपेक्षा जास्त लोकांच्या मृत्यूमुळे प्रशासन हतबल झाले आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी युद्धपातळीवर उपाययोजना राबविल्या जात आहेत.
याचाच एक भाग म्हणून कोरोनाची साखळी तोडण्यासाठी ब्रेक द चेन अंतर्गत गेल्या शनिवारी मध्यरात्रीपासून प्रशासनाने आठ दिवसांसाठी कडक लॉकडाऊन लागू केला. या काळात दवाखाने, औषध दुकाने, दूध संकलन वगळता सर्वच आस्थापना बंद ठेवण्याचे निर्देश प्रशासनाने दिले आहेत.
दरम्यान, लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर रविवार व सोमवारी तौक्ते चक्रीवादळामुळे पाऊस सुरू होता. या कारणाने नागरिक घराबाहेर पडले नाहीत. मात्र, त्यानंतर दोन दिवसांनी नागरिकांनी अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली बाजारपेठेत चकरा मारण्यास सुरुवात केली. काही व्यापाऱ्यांनी तर आलेल्या ग्राहकांना पाठीमागच्या दाराने सेवा देण्यात धन्यता मानली. त्यामुळे वरवर दिसणारा कडक लॉकडाऊन आतून किती प्रमाणात शिथिलता आहे याचा प्रत्यय येत आहे.
-
-
॥ ठळक मुद्दे ॥
एकीकडे कडक लॉकडाऊनमुळे सर्वसामान्य व्यापारी दुकान बंद करून घरात बसलेला असताना काही होलसेल व्यापारी मागील दाराने ग्राहकांना साहित्य देत आहेत. त्यामुळे अन्य व्यापाऱ्यांतून या लॉकडाऊनबद्दल तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. ------
कोरोनाचा वाढता संसर्ग रोखून साखळी तोडायची असल्यास कोरोना दक्षता समिती, ग्रामपंचायत, तलाठी, मंडल अधिकारी पोलीस प्रशासनाने केवळ बघ्याची भूमिका न घेता कडक कारवाई करण्याची गरज असल्याचे मत नागरिकांतून व्यक्त होत आहे.