पेठवडगाव : शहरात पावसामुळे खराब रस्ते झाले आहेत. या रस्त्यांची दुरुस्ती पालिकेने, सार्वजनिक बांधकाम विभागाने तत्काळ करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. शहरातून आंतरराज्य मार्ग, तसेच जिल्हामार्ग जातो. तसेच वडगाव ही व्यापारी पेठ असल्यामुळे नागरिकांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असते. मुसळधार पावसामुळे शहरातील प्रमुख रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. पालिका चौकामध्ये ‘खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा’ अशी अवस्था झाली आहे. येथील काही हातगाडे व्यावसायिक रस्त्यांमध्येच पाणी ओततात. त्यामुळे हा रस्ता थोडाफार खराब झाला होता. त्यातच पावसामुळे अधिकच भर पडली. पालिका चौक ते विजयसिंह यादव चौक, बिरदेव चौक ते हनुमान रोड, अंबा रोड, भादोले रोड या रस्त्यांची तर दुरवस्थाच झाली आहे. रस्त्यांवरील खड्ड्यात पाणी साचले आहे. या खड्ड्यांतून वाहने गेल्यास नागरिकांच्या अंगावर पाणी उडत आहे. यातून वादाचे प्रसंग उद्भवत आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते शेतकरी संघापर्यंतचा रस्ता हा कायमस्वरूपी दुरवस्थेच्या गर्तेत सापडला आहे. तर अंबा रोड, हनुमान रोड या रस्त्यांवर पालिकेने जलवाहिनी टाकल्यामुळे या रस्त्यांची अधिकच दुरवस्था झाली आहे. तसेच पालिकेच्या जलवाहिन्यांतून वारंवार गळती होते. पालिकेने गळती वेळेत न काढल्यामुळे पाणी रस्त्यांवरच साचून राहते. शहरातील रस्त्यांची अनेकवेळा खुदाई करण्यात येते. या कारणांमुळे रस्त्यांची दुरवस्था झालेली आहे. तर उपनगरांत नवीन जलवाहिन्या टाकल्यामुळे रस्त्यांची अवस्था बिकट आहे. नागरिकांना ये-जा करताना त्रासाचे होत आहे. परिणामी, महिला व लहान मुले घसरून पडत आहेत. वडगाव ते टोप संभापूर रस्त्यामध्ये खड्डेच खड्डे आहेत. दोन्ही बाजूला खड्डे असल्यामुळे दुचाकीस्वार खड्डे चुकविण्यासाठी मधूनच गाडी चालवितात. तशीच अवस्था वाठार नाका ते वाठार रस्त्यांची झाली आहे. वडगाव ते लाटवडे, वडगाव ते मिणचे, वडगाव ते तासगाव हे रस्ते खराब झाले आहेत. याकडे पालिका, सार्वजनिक बांधकाम खाते यांनी लक्ष देण्याची गरज आहे. हद्दीचे त्रांगडे ४वडगाव शहरातील काही रस्ते पालिकेच्या, तर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मालकीचे आहेत. शहरातील सार्वजनिक बांधकाम खात्याच्या रस्त्यावर पालिकेच्या जलवाहिन्या आहेत. यामुळे हे रस्ते खराब झाल्यास दुरुस्तीबाबत सार्वजनिक विभाग उदासीन असतो. ४सार्वजनिक बांधकाम खात्याचे रस्ते आम्ही दुरुस्त का करू, अशी पालिकेची भूमिका असते. या दोघांच्या अप्रत्यक्ष वादाचा फटका नागरिकांना बसतो.
पेठवडगावात रस्त्यांचे ‘तीन तेरा’
By admin | Published: August 08, 2016 11:28 PM