कोल्हापूर : सलग तीन दिवसांच्या सुट्टीनंतर जिल्ह्यातील ४३३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी सोमवारी विक्रमी तीन हजार ३७ इतके उमेदवारी अर्ज दाखल झाले. यात सर्वाधिक संख्या कागल तालु्क्याची असून, करवीरसह सर्वच तालुक्यांतील तहसील कार्यालयांमध्ये उमेदवारी अर्ज भरण्यासाठी इच्छुकांसह समर्थकांची झुंबड उडाली होती.कोल्हापूर जिल्ह्यातील १२ तालुक्यांतील ४३३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची रणधुमाळी सध्या सुुरू असून, ३० तारखेपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत आहे. बुधवारपासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली.
पहिल्या दिवशी २६, गुरुवारी ५०० अर्ज आले; मात्र शुक्रवारी ख्रिसमस, त्यानंतर शनिवार आणि रविवार अशा सलग तीन दिवस सुट्ट्या आल्या. त्यामुळे सोमवारी सकाळपासूनच तालुक्याच्या ठिकाणी उमेदवारी अर्ज भरण्यास इच्छुकांची व समर्थकांची झुंबड उडाली होती. इच्छुकांसोबत त्यांचे कुटुंबीय, नातेवाईक असा गोतावळा आला होता.
आठवड्याच्या पहिल्या दिवशी दोन हजार ९५३ व्यक्तींनी तीन हजार ३७ अर्ज भरले. अशारीतीने तीन दिवसांत तीन हजार ४६९ इच्छुकांनी तीन हजार ५६३ अर्ज भरले आहेत.