कोल्हापूर : जनता सुरक्षित राहावी, शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून झटणारे पोलिसांचे हात कोरोना काळात लोकांच्या सुरक्षिततेसाठी पुढे आले आहेत. पोलिसांनी बेशिस्तांना शिस्त लावण्याचे काम केल्याने अनेक जण कोरोनापासून सुरक्षित राहिले. अशा पोलीस प्रशासनाच्या सुरक्षिततेसाठी आमदार चंद्रकांत जाधव यांनी राबवलेला मास्क वाटपाचा उपक्रम कौतुकास्पद आहे, असे गौरवोद्गार पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी काढले.
शहर-जिल्ह्यात कोरोना वाढू नये, या हेतूने वर्षभरापासून पोलीस रात्रंदिवस रस्त्यांवर खडा पहारा देत आहेत. या काळात अनेक पोलिसांना कोरोनाची बाधा झाली. तरीही त्यांनी "सद्रक्षणाय खलनिग्रहणाय'' या ब्रीदनुसार सामाजिक बांधिलकी जोपासली. या पोलिसांची सुरक्षितता महत्त्वाची आहे, हे जाणून आमदार जाधव यांच्या वतीने पोलिसांना तीन हजार एन-९५ मास्कचे वाटप करण्यात आले. आमदार जाधव यांचे चिरंजीव सत्यजित जाधव, चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे, चेंबर ऑफ कॉमर्सचे मानद सचिव धनंजय दुग्गे, उदय जाधव यांच्या हस्ते पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे व शहरातील सर्व पोलीस ठाण्यात मास्कचे वाटप करण्यात आले.
१७०४२०२१-कोल-पोलीस मास्क
कोल्हापुरात पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्याकडे सत्यजित जाधव, चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे यांच्या हस्ते मास्क सुपूर्द करण्यात आले. यावेळी धनंजय दुग्गे, उदय जाधव आदी उपस्थित होते.