कोल्हापूर : छत्रपती शाहू टर्मिनस येथून सोमवारी रात्री साडेनऊ वाजता किसान रेल ही रेल्वे रवाना झाली. या रेल्वेतून इचलकंरजी येथील तीन टन कापडाच्या गाठी पाठविण्यात आल्या.मध्य रेल्वेने शुक्रवारपासून देवळाली-मुझफ्फरपूर किसान रेलची सुरुवात केली आहे. पहाटे साडेपाच वाजता छत्रपती शाहू टर्मिनस येथून शेतीमालासह इतर पार्सल घेऊन रेल्वे मनमाडकडे रवाना झाली होती.
त्यानंतर सोमवारी सायंकाळी साडेसहा वाजता पुणे येथून कोल्हापूरमध्ये आली. येथून रात्री साडेनऊ वाजता ती रवाना झाली. त्यातून इचलकंरजीमधील तीन टन कापडाच्या गाठी हावडा, विजयवाडा, चेन्नई, आदी ठिकाणी पाठविण्यात आले.
कोरोनामुळे रेल्वेची यंत्रणा ठप्प झाली आहे. अशा काळात रेल्वेला गती देण्यासाठी प्रशासनाने पार्सल वाहतुकीकडे वळण्याचा निर्णय घेतला आहे. शेतीमालासह इतर पार्सलसाठी एका विशेष अशा ‘किसान रेल्वे’ची साेय केली आहे.
पाच डबे असणाऱ्या रेल्वेमध्ये सव्वादोन टन भाजीपाल्यासह इतर पार्सल होती. ही रेल्वे मिरज, सांगोला, पंढरपूर, कुर्डूवाडी, दौंड, अहमदनगर या मार्गांवरून शेतीमाल घेऊन साधारणत: सायंकाळी ६.२५ वाजता मनमाड येथे पोहोचणार आहे.
रविवारी (दि. २३) सकाळी आठ वाजता ती मुझफ्फरपूर येथे पोहोचेल. त्यानंतर सोमवारी (दि. २४) सकाळी सात वाजून ४५ मिनिटांनी देवळाली येथे पाेहोचेल. ही विशेष रेल्वे सेवा २५ सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार असून, कोल्हापुरातून प्रत्येक शुक्रवारी ती मनमाडसाठी सुटणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.