कोल्हापूर : दुचाकी व घरफोडीच्या गुन्ह्यांत तरबेज असणाऱ्या तिघा चोरट्यांना रविवारी राजारामपुरी पोलिसांनी अटक केली. संशयित महावीर बळवंत भास्कर (वय ३१), योगेश सर्जेराव कांबळे (२३, दोघे रा. कुडित्रे, ता. करवीर), सौरभ शशिकांत कसबेकर (२२, रा. रंकाळा-दुधाळी) अशी त्यांची नावे आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडून तीन दुचाकी व रोख रक्कम जप्त केली. संशयित महावीर भास्कर व योगेश कांबळे यांनी कुडित्रे येथील गावडे किराणा स्टोअर्स फोडून ३८ हजार रुपये लंपास केल्याची व कुडित्रे कारखान्याची कामगार चाळ येथून दोन दुचाकी चोरल्याची कबुली दिली आहे. अधिक माहिती अशी, राजारामपुरीचे गुन्हे शाखेचे पथक रविवारी सायबर चौक, राजेंद्रनगर, साळोखेनगर, शेंडा पार्क परिसरात गस्त घालत असताना पोलिस उपनिरीक्षक अण्णाप्पा कांबळे यांना दोन तरुण रेणुका मंदिराजवळ चोरीची दुचाकी विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी तिथे सापळा लावला. दुपारी साडेबाराच्या सुमारास नंबर नसलेल्या दुचाकीवरून दोन तरुण बोलत जात असताना दिसले. त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले असता त्यांनी दुचाकी व घरफोडीच्या गुन्ह्यांची कबुली दिली. दरम्यान, पोलिस रेकॉर्डवरील सराईत चोरटा सौरभ कसबेकर याला चौकशीसाठी ताब्यात घेतले असता त्याने राजारामपुरीच्या मुख्य रस्त्यावरून दुचाकी चोरल्याची कबुली दिली. या तिघा संशयितांना आज, सोमवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे. त्यांच्याकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असल्याचे पोलिस उपनिरीक्षक कांबळे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
तिघा अट्टल चोरट्यांना अटक
By admin | Published: August 22, 2016 12:41 AM