कोल्हापूर : गोविंदांचा ओसंडून जाणारा उत्साह, स्फूर्तीदायक गीते, कलाकारांचा सहभाग आणि जिंकण्याची ईर्षा असल्या दहीहंडी उत्सवासाठी कोल्हापूरकर सज्ज झाले आहेत. गुरुवारी म्हणजेच ७ सप्टेंबरला इथे दहीहंडीचे थरावर थर चढणार आहेत.युवाशक्ती दहीहंडी : धनंजय महाडिक युवाशक्ती आणि भारतीय जनता पक्षाने गुरुवारी तीन लाख रुपयांची बक्षिसे असलेली युवाशक्ती दहीहंडी स्पर्धा आयोजित केली आहे. दुपारी ४ वाजता दसरा चौकात या स्पर्धेला प्रारंभ होईल. विजेत्या संघाला रोख ३ लाख रुपयांचे पारितोषिक. प्रत्येक पथकाला, तसेच सहा थरांची सलामी देणाऱ्या पथकाला १० हजार, तर सात थर रचून सलामी देणाऱ्या पथकाला १५ हजार रुपयांचे पारितोषिक. महिला पथकांना २५ हजार रुपयांचे प्रोत्साहनपर पारितोषिक.शिवसेनेची निष्ठा दहीहंडी : शिवसेनेकडून मिरजकर तिकटी येथे दुपारी ३ वाजता ही निष्ठा दहीहंडी रंगणार आहे. या स्पर्धेत विजेत्या गोविंदा पथकाला एक लाख ११ हजार रुपयांचे बक्षीस. दहीहंडीवेळी आकर्षक विद्युत रोषणाई, कलानृत्याचा आविष्कार.गुजरीचा गोविंदा दहीहंडी : न्यू गुजरी मित्र मंडळ गेली ३६ वर्षे जल्लोषात गुजरीचा गाेविंदा ही एक लाखाचे बक्षीस असलेली दहीहंडी दुपारी ४ वाजता सुरू. करवीर गर्जना ढोल-ताशा पथक आणि इंडियाज गॉट टॅलेंटमधील डान्स ग्रुप झिरो डिग्रीचे कलाकार अभिनेत्री जान्हवी व्यास, ढोलकीच्या तालावर फेम लक्ष्मी खैरे त्यांची कला सादर करणार आहेत. ब्रँडेड साउंड सिस्टीम, आतषबाजी, स्पायरो व लाइट शोचेही आयोजन. धान्य व्यापारी मंडळ, लक्ष्मीपुरी : कोल्हापूर धान्य व्यापारी मंडळामार्फत १९८२ पासून दहीहंडी उत्सव सुरू.या ठिकाणी रंगेल दहीडंडीचा थरार- शिवसेना, मिरजकर तिकटी, वेळ : दु. ३ वाजता.- धान्य व्यापारी मंडळ, लक्ष्मीपुरी, वेळ : दु. ३:३० वाजता.- धनंजय महाडिक युवाशक्ती, दसरा चौक, वेळ : दु. ४ वाजता.- न्यू गुजरी मित्रमंडळ, गुजरी, वेळ : दु. ४ वाजता.- बावडेकर आखाडा, शिवाजी पेठ, वेळ : दु. ४ वाजता.- छत्रपती शिवाजी चौक संयुक्त मित्रमंडळ, शिवाजी चौक, वेळ : सायंकाळी ५ वाजता.- मनसे दहीहंडी, गुजरी काॅर्नर, भाऊसिंगजी रोड, वेळ : सायं. ६ वाजता.
वाहतूक नियोजनात बदल
दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहर वाहतूक नियंत्रण शाखेने वाहतूक नियोजनात आवश्यक बदल केले आहेत. दहीहंडीचे आयोजन केलेले दसरा चौक, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, गुजरी चौक, मिरजकर तिकटी परिसरात वाहनांना उत्सव काळात प्रवेश बंद राहणार आहे. या मार्गांवरील वाहतूक जवळच्या अन्य पर्यायी मार्गांवरून वळविण्यात आली आहे. दहीहंडीचा थरार पाहण्यासाठी येणाऱ्या नागरिकांची वाहने पार्क करण्यासाठी चित्रदुर्ग मठ, शहाजी कॉलेज, व्हिनस कॉर्नर गाडी अड्डा, खानविलकर पेट्रोल पंपाशेजारी शंभर फुटी रोड, करवीर पंचायत समिती परिसर, प्रायव्हेट हायस्कूल मैदान, शाहू स्टेडियम आणि शिवाजी स्टेडियमबाहेरील परिसर तसेच बिंदू चौक पार्किंग येथे व्यवस्था केली आहे, अशी माहिती शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे निरीक्षक नंदकुमार मोरे यांनी दिली.