कोल्हापूर : संभाजीनगर रिंगरोडवरून आलेली दरोडेखोरांच्या मोटार कार टेहळणीवरील दोघा पोलिसांनी दुचाकीवरून थरारक पाठलाग करीत सायबर चौकात दबा धरून बसलेल्या पोलीस पथकाला सतर्क केले. पुढे सायबर चाैकात मोटार कार येताच तिच्या आडवी दुचाकी घालून ती अडविली. सापळा रचलेल्या पोलिसांनी मोटारीवर झडप घालून दरोडेखोरांच्या मुसक्या आवळल्या.
कराडमधील दरोडेखोर कोल्हापूरात निळ्या मोटारीतून येणार असल्याची गोपनीय माहिती राजारामपूरी पोलीस ठाण्याचे काॅन्स्टेबल महेश पोवार यांना सायंकाळी पाच वाजता मिळाली. त्यांनी वरिष्ठांना माहिती दिली. सायबर चौकात पोलिसांनी सापळा रचला. तर महेश पोवार व सुरेश नाळे हे पोलीस दोघे दुचाकीवरून संशयित मोटारीचा रिंगरोडवर माग काढत होते. संभाजीनगरकडून रिंगरोडवरून सुसाट निळ्या रंगाची मोटारकार सायबर चौकाकडे धावली. पोवार व नाळे यांनी दुचाकीवरून एसएससी बोर्डापासून मोटारीचा थरारक पाठलाग केला. पुढे सायबर चौकात हॉटेलनजीक महेश पोवार याने दुचाकी मोटारीच्या आडवी घालून थांबविली. मोटार घासल्याने पोवार यांच्या पायाला दुखापत झाली. त्याक्षणीच पोलीस उपनिरीक्षक समाधान घुगे यांनी जीवाची पर्वा न करता प्रथम चालकावर झडप टाकून त्याचा ताबा घेतला. इतरांनी मोटारीस घेराव घालून पाचही दरोडेखोरांवर काही कळण्यापूर्वीच पकडले,
दरोडेखोर पळून जाण्याच्या प्रयत्नात त्यांची पोलिसांशी झटापटही झाली.
पाचही जणांची झडती घेतली असता एकाकडे मॅगझिनसह गावठी पिस्तूल मिळाले. तसेच मोटारीत मॅगझिनमध्ये चार जिवंत राऊंड, मोटारीत तलवारी, दोरी, मोबाईल, बॅटऱ्या आदी प्राणघातक शस्त्रसाठा सापडला.
कारवाईत पोलीस उपनिरीक्षक समाधान घुगे यांच्यासह कॉस्टेबल महेश पोवार, सुरेश नाळे, भूषण ठाणेकर, उत्तम माने, युक्ती ठोंबरे, सचिन देसाई, सुशांत तळप यांचा समावेश होता.
फोटो नं. ०३०३२०२१-कोल-समाधान घुगे (पीएसआय)
फोटो नं. ०३०३२०२१-कोल- महेश पोवार (पोलीस कॉन्स्टेबल)
फोटो नं. ०३०३२०२१-कोल- सुरेश काळे (पोलीस कॉन्स्टेबल)