कोल्हापूर : वळवाच्या पावसाने आज, मंगळवारी दुपारी कोल्हापूर शहरासह जिल्ह्याच्या अनेक भागाला अक्षरश: झोडपून काढले. वादळी वारा व विजेच्या कडकडाटात झालेल्या या पावसाने शहरवासीयांचा थरकाप उडाला. स्टार्म वॉटर मॅनेजमेंटचे रेंगाळलेले काम, नाल्यांशेजारी झालेली अवैध बांधकामे, रस्ते प्रकल्पातील त्रुटी, बिघडलेली रस्त्यांची उंची, आदींमुळे शहरातील रस्त्यांवर पाणीच पाणी झाले. देवकर पाणंद, पांडुरंगनगरी, शुश्रूृषानगर, राजलक्ष्मीनगर, आदी भागांतील शेकडो घरांत पाणी शिरले. दसऱ्याच्या खरेदीसाठी, महालक्ष्मी दर्शनासाठी व प्रचारासाठी कोल्हापूर शहरातील रस्ते फुलून गेले होते; पण दुपारनंतर या साऱ्या नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली.दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास कोल्हापूर शहर व परिसरात पावसाला सुरुवात झाली. बघता-बघता पावसाने जोर धरला. तासाभरातच रस्त्यावरून पाण्याचे लोट वाहू लागले. मोरे कॉलनी, तपोवन मैदान, कळंबा कारागृह, मोहिते कॉलनी, साळोखेनगर, आपटेनगर, साने गुरुजी वसाहतीचा पूर्व भाग, आदी परिसरातील पावसाचे पाणी देवकर पाणंद येथील मुख्य ओढ्यात शिरले. देवकर पाणंदीपर्यंत ओढ्याचे पाणी पात्र सोडून बाहेर पडले आणि ओढ्याच्या काठावरील शेकडो घरांत पाणी शिरले. राजलक्ष्मीनगर, शुश्रूषानगर, पांडुरंगनगरी, शाम हौसिंग सोसायटी, आदी परिसरातील घरांत तसेच दुकाने, हॉटेलमध्ये गुडघाभर पाणी शिरले. देवकर पाणंदीच्या रस्त्याला तर अक्षरश: नाल्याचे स्वरूप आले होते. दुपारी चार वाजल्यापासून पाण्याचा जोरदार प्रवाह वाहत होता. पाणी घरांत शिरताच अनेक लोक रस्त्यावर आले. घरात पाणी शिरून नुकसान होऊ लागले. साळोखे पार्क येथून सुरू होणारा हा ओढा इराणी खणीपर्यंत धोकादायक पातळीवरुन वाहत होता. संभाजीनगरकडून क्रशर चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावरही एक ते दोन फूट पाणी आल्याने वाहतूक अन्य मार्गाने वळविण्यात आली होती. महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी देवकर पाणंद परिसरात पोहोचले. अनेक ठिकाणी पाणी तुंंबल्याचे त्यांच्या लक्षात येताच त्यांनी जेसीबी यंत्राच्या साहाय्याने काही ठिकाणचे कट्टे, ‘आयआरबी’ने केलेली गटर्स फोडून पाणी पुढे सरकण्यासाठी वाट करून दिली.महादेवनगरातही पाणीराधानगरी रोडवरील संतोष कॉलनी परिसरात असलेल्या महादेवनगरातील रस्त्याला ओढ्याचे स्वरूप प्राप्त झाले होते. या रस्त्यावर तीन फूट पाणी होते. या ठिकाणी आठ घरांत पावसाचे पाणी शिरले. शहराला डबक्यांचे स्वरूपतासभराच्या पावसाने संपूर्ण शहराला डबक्यांचे स्वरूप आले. स्टार्म वॉटर मॅनेजमेंटचे रेंगाळलेले काम, नाल्यांशेजारी झालेली अवैध बांधकामे, रस्ते प्रकल्पातील त्रुटी, बिघडलेली रस्त्यांची उंची आदींमुळे शहरातील रस्त्यांवर पाणीच पाणी झाले. काही ठिकाणी फुटापेक्षा अधिक असलेल्या या पाण्यातून वाहन चालविताना वाहनधारकांना कसरत करावी लागत होती. शहरातील तावडे हॉटेल ते व्हीनस चौक, शिये नाका ते जयंती नाला, शाहूपुरी मुख्य रस्ता, लक्ष्मीपुरी परिसर, आदी रस्त्यांवर पावसाच्या पाण्याची डबकी साचली आहेत. परीख पुलाखाली पाणीच पाणीमुख्य बसस्थानक ते राजारामपुरी अशा दोन भागांना जोडणाऱ्या रेल्वेच्या परीख पुलाखाली पाणी साचल्याने वाहनधारकांना पर्यायी मार्गांचा अवलंब करावा लागला. वर्षापूर्वी राजारामपुरी विभागीय कार्यालयाने गटर्स, ड्रेनेजसह अन्य दुरुस्तीच्या कामांसाठी ३० लाख रुपयांचा निधी खर्च केला होता. इतके खर्च करूनही परीख पुलाचे दुखणे कायम आहे.आजऱ्यात धुवाधारआजरा : दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास अचानक पावसाने हजेरी लावली. पावसामुळे आजरा बाजारपेठेत पाणीच पाणी झाले होते. नवरात्रौत्सवाच्या आनंदावर मात्र पावसाने पाणी पडले. अनेक मंडळांना आजचे कार्यक्रम रद्द करावे लागले. याशिवाय शिरोळ, कुरुंदवाड, जयसिंगपूर, पन्हाळा, जोतिबासह पारगाव-अंबप परिसराला पावसाने झोडपले. हा पाऊस भात पिकासाठी उपयुक्त ठरणारा असला, तरी भुईमूग, सोयाबीनच्या तयार पिकासाठी हानीकारक आहे. अंबाबाई मंदिरात फूटभर पाणीकोल्हापूर : गेल्या पंधरा दिवसांपासून उसंत घेतलेल्या पावसाने आज, मंगळवारी जोरदार हजेरी लावल्याने भाविकांनी पावसाच्या सरी झेलतच करवीर निवासिनी अंबाबाईचे दर्शन घेत देवीच्या भक्तीत चिंब झाले. अचानक धो-धो कोसळलेल्या पावसामुळे मंदिरात फूटभर पाणी साचले होते, तर संध्याकाळी दर्शनरांगा अक्षरश: ओस पडल्या होत्या. परिसरातील किरकोळ विक्रेत्यांनाही आपला पूजेच्या साहित्य विक्रीचा व्यवसाय बंद करावा लागला. एकूणच आज उत्सवाच्या उत्साहावर पावसाचे पाणी पडले. आज दुपारी तीन वाजेपर्यंत पूर्व दरवाजामधील दर्शनरांगा भाविकांच्या गर्दीने फुलून गेल्या होत्या. दुपारी साडेतीन वाजल्यानंतर ढगांचा गडगडाट करत जोरदार पावसाला सुरुवात झाली. तरीही भाविकांनी रांग सोडली नाही. याठिकाणी ओढ्याप्रमाणे पाणी वाहत होते. मंदिरातही फूटभर पाणी साचले होते. साडेचार वाजल्यानंतर मात्र मंदिराच्या परिसरातील गर्दी ओसरली. . रांगांवर पत्रे असले तरी पूर्व दरवाजातून आत आल्यावर असलेल्या लोखंडी पुलावर पत्रे नाहीत त्यामुळे या ठिकाणी भाविकांना पावसात भिजत उभे राहावे लागले. भाविकांना देवस्थान समितीच्या कार्यालयाबाहेर सुरू सांस्कृतिक कार्यक्रमांचा लाभही उभे राहूनच घ्यावा लागला. पावसामुळे परिसरात पूजेचे साहित्य विक्रेत्यांनाही व्यवसाय बंद ठेवावा लागला. चंदगड तालुक्यात वादळी पावसाचा तडाखाचंदगड : परतीच्या मान्सून पावसाने चंदगड तालुक्याला दुसऱ्या दिवशीही झोडपून काढले. वादळी वारे व मेघगर्जनेसह झालेल्या पावसामुळे पाटणे फाटा येथील आंब्याचे झाड कोसळून भरमाजी तुपारे (कार्वे) व नामदेव गोरल (हल्लारवाडी) यांच्या मोटारसायकली झाडाखाली सापडून त्यांच्या चक्काचूर झाला आहे. शिनोळी येथे लावण्यात आलेली पोलीस चौकी वाऱ्याने उडून गेली.
वादळी पावसासह विजांची दहशत
By admin | Published: October 01, 2014 1:14 AM