संतोष मिठारीकोल्हापूर : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने मध्य रेल्वे कोल्हापुरातून धावणाऱ्या सात रेल्वेचा टप्प्याटप्याने विशेष दर्जा काढून त्यांची सेवा सुरू केली. दर्जा काढून महिना होत आला, तरी अद्याप जनरल तिकिटांची विक्री बंद आहे. तिकीट आरक्षित असेल, तरच या रेल्वेतून प्रवास करता येतो. त्यामुळे रेल्वेत सर्वसामान्यांना ‘नो एन्ट्री’ असल्याचे चित्र आहे.कोल्हापुरातील श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस येथून तिरुपती, दिल्ली, धनबाद, अहमदाबाद, नागपूर, मुंबई या मार्गांवर रेल्वे धावत आहे. कोल्हापूर-सातारा मार्गावर पॅसेंजर सेवा सुरू झाली आहे. त्यातील पॅसेंजर वगळता अन्य रेल्वेतून प्रवास करण्यासाठी तिकीट आरक्षण करणे आवश्यक आहे. विशेष दर्जा रद्द झाला, तरी आरक्षण करणे बंधनकारक असल्याने प्रवाशांना जादा पैसे आणि वेळ खर्च करावा लागत आहे. जनरल तिकीट विक्री पूर्ववत सुरू करण्याची मागणी प्रवाशांनी शुक्रवारी केली.
सध्या सुरू असलेल्या एक्स्प्रेसकोल्हापूर-धनबादकोल्हापूर-दिल्लीकोल्हापूर-नागपूर (व्हाया पंढरपूर)कोल्हापूर-अहमदाबादकोल्हापूर-मुंबई (महालक्ष्मी)कोल्हापूर-तिरुपतीकोल्हापूर-मुंबई (कोयना)कोल्हापूर-नागपूर (महाराष्ट्र)
आरक्षण तिकीट असेल तरच एक्स्प्रेसचा प्रवास
मध्य रेल्वेच्या नियमानुसार कोल्हापुरातून धावणाऱ्या सात रेल्वेंतून प्रवास करण्यासाठी आधी तिकीट आरक्षण करणे आवश्यक आहे. याबाबत मध्य रेल्वेच्या सूचनेनुसार कार्यवाही सुरू असल्याचे श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनसचे प्रभारी प्रबंधक सुरेशकुमार यांनी सांगितले.
आरक्षित डब्यात फुकटे वाढले
विनातिकीट एखाद्याने प्रवास केलेला आढळल्यास संबंधित मार्गावरील तिकिटाची रक्कम आणि २५० रुपये दंड त्याच्याकडून वसूल करण्यात येतो. ऑक्टोबरमध्ये रेल्वेस्थानकावरील तिकीट संग्राहकांनी ३०८, तर नोव्हेंबरमध्ये ३०० जणांकडून दंड वसूल केला आहे. रोज किमान दहा प्रवासी विनातिकीट सापडतात.
प्रवासी म्हणतात
रेल्वेचा विशेष दर्जा काढला असल्याने आता जनरल तिकीट विक्री सुरू करावी. पॅसेंजरची संख्या वाढवावी. -शिवनाथ बियाणी
तिकीट आरक्षण करण्यात वेळ आणि पैसा अधिक खर्च होतो. त्याचा त्रास आम्हा प्रवाशांना होत आहे. त्याची दखल रेल्वे प्रशासनाने घ्यावी. -इम्रान शेख