कोल्हापूर : येथील भूमिपुत्रांनी साकारलेले व भारतभर घोडदौड करणारे आशिया खंडातील भव्यदिव्य ‘शिवगर्जना’ हे महानाट्य २४ जानेवारीपासून कोल्हापुरात होत आहे. त्याचा तिकीट अनावरणाचा व नाटकाच्या ६० बाय २० फूट फलकाच्या अनावरणाचा कार्यक्रम शनिवारी उत्साहात झाला.छत्रपती शिवाजी चौकात महानाट्याच्या तिकिटाचे अनावरण प्रमुख पाहुणे आमदार चंद्रकांत जाधव, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, माजी उपमहापौर भूपाल शेटे, शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे, शहरप्रमुख शिवाजी जाधव, योगदान फौंडेशनचे अध्यक्ष नगरसेवक विजयसिंह खाडे-पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.यावेळी हायड्रॉलिक क्रेनच्या साहाय्याने छत्रपती शिवरायांच्या जीवनावर आधारित प्रसंगांचा भव्य डिजिटल फलक उभारण्यात आला. तो पाहण्यासाठी शिवप्रेमींसह शहरवासीयांची दिवसभर गर्दी झाली होती. तिकिटाची विक्री सोमवार (दि. १३) पासून केशवराव भोसले नाट्यगृह, शाहू स्मारक भवन व ड्रीमवर्ल्ड वॉटर पार्क येथे होणार आहे. महानाट्य २४ ते २८ जानेवारी या कालावधीत सायंकाळी ६.३० ते रात्री १० या वेळेत जरगनगर मार्गावरील निर्माण चौकात होणार आहे.यावेळी निर्मात्या रेणू यादव, दिग्दर्शक स्वप्निल यादव, शिरीष कदम, रतनलाल बाफनाचे विकास जैन, आविष्कार ग्रुपचे अविनाश जाधव उपस्थित होते.