चंदगड : दिवसाढवळ्या टस्काराचा धुमाकुळातून सावर असतानाच सोमवारी पुन्हा सांयकाळी अडकूर भागात वाघाचे दर्शन झाल्याने परिसरात भितीचे वातावरण पसरले असून रात्री आठ वाजता अडकूर ग्रामपंचायतीच्यावतीने लोकांना सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे. शुक्रवारी अडकूर भागातील केंचेवाडी, आमरोळी, अलबादेवी गावात टस्काराने धुमाकूळ घातला होता. त्यामुळे शेतकऱ्यांसह लोकांमध्ये भितीचे वातावरण पसरले होते. त्यानंतर दोन दिवस होतात न होतात त्यात पुन्हा अडकूर येथील निकम रेंगडे यांच्या शेतात वाघाच्या पायाचे ठसे आढळून आले.
सोमवारी सांयकाळी सातच्या सुमारास लोकांच्या निदर्शनास ठसे आल्याने परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे. याबाबत अडकूर ग्रामपंचायतीवतीने वनविभागाला कळविण्यात आले. त्यानंतर वन विभागाकडून लोकांनी सावधगिरी बाळगावी तसेच रात्रीच्या वेळी कोणीही अनावश्यक घराबाहेर पडू नये, याबाबतच्या सूचना गावात द्याव्यात, असे सांगण्यात आले. त्यानुसार ग्रामपंचायतच्यावतीने सोमवारी रात्री वाघाचे दर्शन झाल्याने लोकांनी सावधगिरी बाळगावी, अशी सूचना करण्यात आली. तसेच वनक्षेत्रपाल नंदकुमार भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पायाचे ठसे तपासले असता वाघाचा वावर या परिसरात असल्याचे स्पष्ट करण्यात आले असून त्याच्या मार्गात सीसीटीव्ही लावण्यात आल्याचे असे वनविभागाकडून सांगण्यात आले.