कोल्हापूर : दक्षिणेकडील तसेच तिलारीकडे असणारे वाघ वरच्या बाजूला सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या क्षेत्रात येत नाहीत असे निरीक्षण आहे. त्यामुळे येणाऱ्या दोन वर्षांत यामध्ये वाघ आणून ठेवण्याचे नियोजन असल्याची माहिती वन्यजीव विभागाचे मुख्य वनसंरक्षक सुनील लिमये यांनी दिली.
लिमये म्हणाले, राज्यात ३०० वाघ आहेत. यातील १५० वाघ एकट्या चंद्रपूर जिल्ह्यात आहेत. त्यातील एकट्या ब्रह्मपुरी तालुक्यात ६० हून अधिक वाघ आहेत. त्यामुळे येथील काही वाघ अन्य ठिकाणी नेण्याचे नियोजन आहे. राजस्थान राज्यानेही आमच्याकडे काही वाघ मागितले आहेत. परंतु, त्यासाठी राष्ट्रीय पातळीवरील समिती निर्णय घेते. राजस्थानला वाघ देण्याबाबत प्रशासकीय कार्यवाही सुरू आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील काही वाघ सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये दोन वर्षांत आणले जातील. त्याआधी त्यांच्यासाठीचे नैसर्गिक खाद्य उपलब्ध असणे आवश्यक आहे. सांबर आणि काळवीट हे त्यांचे प्रामुख्याने अन्न आहे. परंतु, हे दोन्ही प्राणी सह्याद्रीच्या या पट्ट्यात कमी आहेत. त्यामुळे येत्या दोन वर्षांत १०० हून अधिक सांबर आणून चांदोलीतील झोळंबी येथे ठेवण्यात येतील. त्यांची संख्या वाढल्यानंतर वाघ आणले जातील.
सांबरांची संख्या वाढली की मग वाघ
एकदा का सांबर आणि काळविटांना पिल्ले झाली, संख्या पुरेशी वाढू लागली की मोठ्या सांबर, काळविटांना जंगलात सोडले जाईल. त्यानंतर दोन, तीन नर वाघ आणि मादी आणली जाईल, असे यावेळी लिमये यांनी स्पष्ट केले.