कोल्हापूर : कोरोना संक्रणाची साखळी तोडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पुकारलेल्या ‘वीकेंड लॉकडाऊन’ला कोल्हापुरात चांगला प्रतिसाद लाभला. शहरातील रस्ते निर्मनुष्य राहिले. संपूर्ण शहरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त राहिला. शहरातील प्रमुख चौकातील परिस्थितीवर पोलिसांनी मुख्यालयातील सीसी टीव्ही कॅमेराद्वारे वॉच ठेवला. रस्त्यावर नागरिक एकत्रित दिसताच मुख्यालयातून वायरलेसवरून सूचना देऊन त्यांच्यावर नियंत्रण ठेवले.
कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव रोखण्यासाठी ‘ब्रेक द चेन’साठी प्रशासनाने शनिवारी व रविवारी वीकेड लॉकडाऊन केले. शहराच्या चौका-चौकात पोलीस, होमगार्ड तसेच वाहतूक पोलिसांनी खडा पहारा दिला. शहरात प्रवेशणाऱ्या प्रत्येक वाहनधारकांची विचारपूस करूनच त्यांना शहरात प्रवेश दिला जात होता. विनाकारण फिरणाऱ्याच्या दुचाकी जप्त केल्या. त्यामुळे रस्ते, चौक सुनसान होते. फक्त अत्यावश्यक कारणांसाठी काहीजण वाहनावरून फिरताना दिसत होते. तेही पोलिसांचा नजरेतून सुटत नव्हते.
दिवसभर तावडे हॉटेल, ताराराणी चौक, दसरा चौक, शिवाजी पूल, कळंबा नाका, सायबर चौक, कसबा बावडा, शिये नाका, साने गुरुजी वसाहत, आर.के.नगर या प्रमुख ठिकाणी नाकाबंदी करून वाहनांची तपासणी केली जात होती. पोलीस उपअधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली दुपारी जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रमोद जाधव, राजारामपुरीचे पो.नि. सीताराम डुबल, शाहुपुरीचे पो.नि. श्रीकृष्ण कटकधोंड, शहर वाहतूक शाखेच्या पोलीस निरीक्षक स्नेहा गिरी तसेच काही पोलिसांनी संपूर्ण शहरातून वाहनांचे संचालन केले. यावेळी कोपऱ्यावर नाहक उभारलेल्या नागरिरकांना ध्वनिक्षेपावरून कारवाईच्या सूचना केल्या.
जिल्ह्यात दोन हजार पोलिसांचा खडा बंदोबस्त
जिल्ह्यात सुमारे दोन हजार पोलिसांनी खडा बंदोबस्त केला. त्याशिवाय १२७ पोलीस अधिकारी, ५०० होमगार्ड, २५ स्ट्राईकिंग फोर्स, राज्य राखीव दलाच्या दोन तुकड्या, जलद कृती दल, दंगल काबू पथक आदी सुरक्षा यंत्रणा सक्रिय होती.
शहर व उपनगरावर सीसी कॅमेराद्वारे नजर
शहरातील प्रमुख चौकांतील सुमारे २६५ तर उपनगरातील असे एकूण ३६० सीसी टीव्ही कॅमेराद्वारे लॉकडाऊनवर नजर ठेवली जात होती. या सीसीटीव्ही कॅमेराचे नियंत्रण मुख्यालयात असल्याने या ठिकाणी लक्ष ठेवण्यासाठी विशेष यंत्रणा ठेवली होती. शहरात एखाद्या चौकात काही लोक दिसल्यास तातडीने तेथील बंदोबस्तातील पोलिसांना वायरलेसवरून गर्दी हाटवण्याच्या सूचना केल्या जात होत्या. त्यामुळे बंदोबस्तातील पोलीस यंत्रणाही अलर्ट होती.
पोलीस अधीक्षकांची कोल्हापूर, इचलकरंजी फेरी
लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी दुपारपर्यंत कोल्हापूर शहरासह इचलकरंजी शहरात भेटी देऊन बंदोबस्ताचा व परिस्थितीचा आढावा घेतला. अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. तिरुपती काकडे यांनी कोल्हापूर शहर व उपनगरात फिरून बंदोबस्तावर नजर ठेवली.
कोट...
शासनाने लागू केलेले निर्बंध पाळण्यासाठी जिल्ह्यात व्यापारी संघटना, नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. पोलीसही शुक्रवारी रात्रीपासून रस्त्यावर बंदोबस्त देत आहेत. कोरोना संक्रमणाची साखळी तोडण्यासाठी नागरिकांनी पुढील पंधरवड्यातही अशाच पध्दतीने प्रशासनाला सहकार्य करावे. - शैलेश बलकवडे, पोलीस अधीक्षक, कोल्हापूर जिल्हा