कऱ्हाड : शहरात शुक्रवारी रात्री झालेल्या तोडफोड व दगडफेकप्रकरणी कऱ्हाड शहर पोलिसांत २७ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यापैकी १३ जणांना अटक केली असून, पसार झालेल्यांचा शोध घेतला जात आहे. दरम्यान, जमावाने केलेल्या हल्ल्यात महिलांसह अन्य काहीजण जखमी झाले असून, दोघांवर उपचार सुरू आहेत. दगडफेक व तोडफोडीत लाखोंचे नुकसान झाले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी दुपारी कऱ्हाडात किरकोळ कारणावरून युवकांच्या दोन गटांत मारहाण झाली. सायंकाळी याबाबत कऱ्हाड शहर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवून घेण्याचे काम सुरू होते. मात्र, त्यावेळी आपापसात हे प्रकरण मिटविण्याबाबतही सकारात्मक चर्चा झाली. काही लोकप्रतिनिधींनीही त्यासाठी पुढाकार घेतला होता. अशातच रात्री दहा वाजण्याच्या सुमारास याच मारामारीच्या कारणावरून शहरातील मंगळवार पेठेत असलेल्या पालकर वाडा परिसरात तुफान दगडफेक व तोडफोड झाली. पालकर वाडा येथे रात्री उशिरा दोन्ही गटांतील युवक समोरासमोर आले. त्यांनी शिवीगाळ करीत दगडफेक करण्यास सुरुवात केली. तसेच सहा-सात वाहनांची तोडफोड केली. यावेळी काही महिलांनाही मारहाण करण्यात आली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस उपअधीक्षक राजलक्ष्मी शिवणकर, पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांच्यासह पोलीस फौजफाटा घटनास्थळी पोहोचला. त्यांनी जमावाला पांगविले. तसेच तोडफोड व दगडफेक करणाऱ्या युवकांना एका घरातून ताब्यात घेतले. त्यानंतर पालकर वाडा, मंगळवार पेठेत बंदोबस्त तैनात करण्यात आला. (प्रतिनिधी) अटकेत असलेले आरोपी याप्रकरणी कऱ्हाड शहर पोलिसांनी आशपाक अकबर सुतार (वय २६ रा. मंगळवार पेठ), स्वप्नील अशोकराव देसाई (वय १९, रा. सोमवार पेठ), तौफिक रफिक सुतार (वय २०), आरिफ महंमद पालकर (वय १९), नवजा अकबर सुतार (३१), साहिल आलम मुजावर (१९), दाऊद जहांगीर पालकर (२३, सर्व रा. मंगळवार पेठ), अतिफ सुतार (२६ रा. कृष्णाई डेअरी मागे कऱ्हाड), जमिल अल्लाबक्ष आतार (२५, रा. शांतीनगर, मुजावर कॉलनी), आलिम हुसेन दिलाल पटेल (२०, बुधवार पेठ), अनिल महादेव पाटील (३५), योगेश शंकर वाघ (२५, दोघे रा. मंगळवार पेठ), अशरफ सुतार (२३, रा. वाकाण रोड) या तेराजणांना अटक केली आहे. मुलीला चिठ्ठी दिल्याने उफाळला वाद एका अल्पवयीन शाळकरी मुलीस चिठ्ठी दिल्याच्या कारणावरून शुक्रवारी दुपारी वादावादी झाली होती. या वादावादीचे पर्यवसान रात्री दगडफेक व तोडफोडीत झाले असल्याचे शहर पोलिसांनी सांगितले. मुलीला चिठ्ठी दिल्याचे समजल्यानंतर मुलीच्या नातेवाइकांनी संबंधित युवकाला जाब विचारला होता. त्यावेळी वादावादीही झाली होती. त्यानंतरच हे प्रकरण वाढत गेल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. दरोड्यासह इतर गंभीर गुन्हे पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींसह इतरांवर दरोडा, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान, बेकायदा जमाव जमविणे, मारामारी यासह अन्य काही कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींना शनिवारी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना दि. २९ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
दगडफेक, तोडफोडप्रकरणी कऱ्हाडात तेराजण अटकेत
By admin | Published: June 28, 2015 12:29 AM