गडहिंग्लज : 'गोकुळ' हा कुणा एका महाडिकांचा नसून जिल्ह्यातील साडेपाच लाख दूध उत्पादकांचा संघ आहे. त्याच्या उत्पन्नातील ८१ टक्के परतावा दूध उत्पादक शेतकऱ्यांना देऊन केवळ १९ टक्क्यावर संघ चालविला जातो. 'गोकुळ'ची बसलेली ही घडी विस्कटण्यासाठीच विरोधकांची तिघाडी झाली आहे. त्यामुळे त्यांच्या आरोपांची दखल घेण्याची गरज नाही, असा घणाघात माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी केला.
शहरातील गांधीनगर मंगल कार्यालयात आयोजित सत्ताधारी आघाडीच्या प्रचार मेळाव्यात ते बोलत होते. माजी मंत्री भरमू पाटील, माजी खासदार धनंजय महाडिक, माजी आमदार संजय घाटगे यांची प्रमुख उपस्थिती होती.
धनंजय महाडिक म्हणाले, सत्य विरुद्ध असत्य, नीती विरुद्ध अनीती, पारदर्शकता विरुद्ध भ्रष्टाचार अशी ही लढाई आहे. यामध्ये सत्य व नीतीचाच विजय होईल.
यावेळी उमेदवार प्रकाश चव्हाण व सदानंद हत्तरकी यांच्यासह भरमू पाटील, संजय घाटगे, रणजितसिंह पाटील, बाळासाहेब पाटील, मलगोंडा पाटील, संजय बटकडली, मार्तंड जरळी यांचीही भाषणे झाली.
मेळाव्यास वरदशंकर वरदापगोळ, बाबूराव मदकरी, रमेश आरबोळे, किरण पाटील, रवी शेंडुरे, राजेंद्र तारळे, अनुप पाटील, प्रीतम कापसे, राजशेखर पाटील, अशोक पाटील यांच्यासह ठरावधारक उपस्थित होते.
चंद्रकांत सावंत यांनी आभार मानले.
---------------------
विरोधक आमच्या पाचवीलाच पूजलेले आहेत. त्यांची युती अभद्र आहे. त्यामुळे त्यांच्या आरोपांची दखलही घेणार नाही. मी सर्वांचा बाप आहे. योग्यवेळी जाहीर चौकात त्याचे प्रत्युत्तर देईन, या शब्दात महादेवराव महाडिक यांनी विरोधकांच्या टीकेचा समाचार घेतला.
अखेर मौन सोडले
आजपर्यंत 'गोकुळ'च्या निवडणुकीबाबत एकही शब्द न बोललेल्या महादेवराव महाडिक यांनी अखेर यावेळी मौन सोडले. त्यामुळे ते काय बोलणार, याकडे सर्वांचे लक्ष होते. परंतु, विरोधकांवर अधिक टीका-टिपणी करण्याचे टाळून त्यांनी 'गोकुळ'च्या शेतकरी हिताच्या यशस्वी कामगिरीवरच बोलणे पसंत केले.
--------------------
फोटो ओळी : गडहिंग्लज येथे 'गोकुळ'च्या प्रचार मेळाव्यात माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी मार्गदर्शन केले. यावेळी रणजित पाटील, भरमू पाटील, धनंजय महाडिक, प्रकाश चव्हाण, सदानंद हत्तरकी आदी उपस्थित होते. (मज्जीद किल्लेदार)
क्रमांक : २३०४२०२१-गड-१०