आदित्य वेल्हाळतिलारी : पश्चिम घाटाच्या वैभवसंपन्न जैवविविधतेचा संवेदनशिल क्षेत्र म्हणून ओळखले जाणारे तिलारी हे २२ जून २०२० मध्ये महाराष्ट्र शासनाने संवर्धन राखीव क्षेत्र म्हणून घोषित केले. २९.५३ चौरस किलोमीटर भूभाग यामध्ये समाविष्ट करण्यात आला. जैवविविधतेचा हॉटस्पॉट असलेल्या ३८ किलोमीटरचा भ्रमण मार्ग जो सावंतवाडीतील दोडामार्ग ते राधानगरी अभयारण्यापर्यंतचा भाग यामध्ये समाविष्ट होतो. दोडामार्ग येथील तिल्लारी संवर्धन राखीव भूप्रदेश, कर्नाटकातील भीमगड वाइल्डलाइफ सेंच्युरी व गोव्यातील म्हादई वन्यजीव अभयारण्य या तीन राज्यांच्या सीमेवर हे जंगल पसरले आहे.राज्य शासनाने हे जंगल संवर्धित राखीव जंगल म्हणून घोषित केले; परंतु त्यानंतर हे जंगल कितपत संरक्षित व समृद्ध झाले, त्यासाठी शासनाने काय केले हे पाहण्यासाठी प्रस्तुत प्रतिनिधीने या जंगलात प्रत्यक्ष १६ ते १८ मार्चला जाऊन पाहणी केली. राज्य सरकारने घोषणेशिवाय फारसे काही केले नसल्याचेच चित्र अनुभवास आले. कर्नाटकातून २००१ मध्ये पहिल्यांदा याच भागातून हत्ती महाराष्ट्रात आले व कोल्हापूर जिल्ह्यात स्थायिक झाले. वाघांच्या प्रजनन करण्यासाठीचा हे तिल्लारी खोरे सर्वोत्तम जागा असून, प्रजनन झाल्यानंतर वाघ येथूनच कर्नाटक, गोवा व आंबोली परिसरापर्यंत भ्रमण करत असतो. म्हणूनच याला वाघांच्या भ्रमणाचा सर्वोत्तम मार्ग मानला गेला आहे.२०१४ ते २०१९ च्या गणनेनुसार या परिसरात ७ वाघांचे अस्तित्व असल्याचे निदर्शनास आले. चंदगडमध्ये उगम पावणारी तिलोत्तमा नदी ही खाली कोकणात तिल्लारी नदी नावाने प्रचलित आहे. या नदीच्या खोऱ्यामध्ये हे निमसदाहरित व पाणगळी जंगल पसरले असून वाघ, हत्तीप्रमाणेच किंग कोब्राचे अस्तित्व येथे आढळून येते. स्लेंडर लोरीस, हंपनोझ पीट, वायपर, पाणमांजर, मगर, बिबटे, गवे, सांबर येथे आढळून येतात. त्याचप्रमाणे माशांच्या विविध प्रजाती येथे सापडतात. त्याचे संशोधन अजून चालू आहे.कोल्हापूर व सिंधुदुर्ग जिल्ह्यातून जाणाऱ्या भ्रमण मार्गामध्ये काही महत्त्वाच्या वनस्पती, पक्षी, सस्तन प्राणी, उभयचर, सरिसृप, मासे व फुलपाखरे फक्त याच भागात सापडतात. जर जैवविविधतेने समृद्ध असणारा हा वन्यजीवांचा भ्रमण मार्गच आपण योग्यरीतीने संवर्धित केला तर एक दिवस राधानगरी अभयारण्यातही वाघांचे अस्तित्व मुबलक प्रमाणात वाढू शकेल, असे अभ्यासकांचे म्हणणे आहे.
जैवविविधतेने नटलेला हा वाघांचा कॉरिडॉर व्याघ्र प्रकल्प किंवा अभयारण्य म्हणून घोषित झाल्यानंतरच अधिक समृद्ध होईल. त्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. - रमन कुलकर्णी, वन्यजीव अभ्यासक, कोल्हापूर
महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटकमध्ये पसरलेले हेच ते तिल्लारी संवर्धित राखीव जंगलाचे अत्यंत दाट, विस्तीर्ण क्षेत्र, अनेक दुर्मीळ वनस्पती व प्राणी-पक्ष्यांचे हक्काचे निवारा क्षेत्र बनले आहे. (आदित्य वेल्हाळ)तिल्लारी घनदाट जंगलातच किंग कोब्रा
तिल्लारी जंगलात मुक्तपणे विहार करणारा हा गवा.
तिल्लारी जंगलात मलबार हॉर्नबिलचे कुटुंब असे आनंदात जगताना दिसले.