कोल्हापूर : ज्यावेळी स्वत:ला मूल होत नाही, त्यावेळी दत्तक घेतले जाते. पाच वर्षे सत्तेत राहूनही पाळणा हलत नाही म्हटल्यावर दुसऱ्याची मुले दत्तक घेण्याची वेळ भाजपवर आली असून, आयाराम-गयारामांच्या कौतुकातच सत्तेची पाच वर्षे गेल्याची टीका राष्ट्रवादी कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी केली.कॉँग्रेसच्या स्थानिक नेत्यांच्या भेटीगाठीसाठी रविवारी जयंत पाटील कोल्हापुरात आले होते. आघाडीचे उमेदवार धनंजय महाडिक यांच्या कार्यालयात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
पाटील म्हणाले, दोन्ही कॉँग्रेसने उमेदवारी नाकारलेल्यांना भाजपने मैदानात उतरले आहे, त्यांचे काय होणार हे महाराष्ट्राला माहीत आहे. त्यामुळे कोल्हापुरातही आघाडीचे धनंजय महाडिकच विजयी होतील. शाहू, फुले, आंबेडकर यांची विचारधारा मानणारी कोल्हापूरची जनता आहे. ती शिवसेना-भाजपला कधीही भीक घालणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
अडीच लाख खुर्च्या कोल्हापुरात तरी आहेत का?शिवसेना-भाजपच्या प्रचारार्थ तपोवन मैदानात होणाऱ्या सभेबद्दल विचारले असता, पाटील म्हणाले, ‘खोटे बोल; पण रेटून बोल,’ अशी सवय चंद्रकांत पाटील यांना आहे. जिथे सभा होते, त्या मैदानाची क्षमता किती आहे. अडीच लाख खुर्च्या तिथे बसतील का? ते सोडा, एवढ्या खुर्च्या कोल्हापुरात तरी भाड्याने मिळतात का? अशी खिल्ली त्यांनी उडविली.
नाहीतर ‘सतेज’ यांच्याशिवाय प्रचारसतेज पाटील यांना कॉँग्रेस नेत्यांनी समजावण्याचा प्रयत्न केला आहे. अजूनही वेळ गेलेली नाही, त्यांनी दुरुस्त व्हावे. काही वेळा माणसांनी असेच वागायचा निर्धार केलेला असतो. त्यामुळे त्यांना समजावण्याचा प्रयत्न करू. त्यांनी एकले तर ठीक अन्यथा त्यांच्याशिवाय पुढे जाऊ, असे जयंत पाटील यांनी सांगितले.