कोल्हापूर : येथील राजर्षी शाहू महाराज शासकीय महाविद्यालयाच्या ५८ डॉक्टरांवर चार महिने पगार न झाल्याने आंदोलन करण्याची वेळ आली. अखेर जिल्हाधिकारी राहुल रेखाराव यांनी वैद्यकीय सचिव सौरभ विजय यांच्याशी संपर्क साधून येत्या चार, पाच दिवसात वेतन देण्याची ग्वाही दिल्यानंतर काम बंद आंदोलन मागे घेण्यात आले. त्यामुळे रुग्णसेवेवर परिणाम झाला नाही.
या महाविद्यालयातील सर्व कंत्राटी सहाय्यक प्राध्यापक व वैद्यकीय अधिकारी यांना गेले चार महिने वेतन मिळालेले नाही. त्यामुळे त्यांनी दिनांक १३ जुलैला बेमुदत काम बंद आंदोलनाची नोटीस महाविद्यालय प्रशासन आणि जिल्हाधिकारी कार्यालयाला दिली होती. परंतु दहा दिवस उलटून गेले तरी देखील कोणतीच ठोस कार्यवाही न झाल्याने त्यांनी गुरूवारपासून काम बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार सकाळी १० च्या सुमारास सर्वजण एकत्र आले. त्यांनी अधिष्ठाता डॉ. एस. एस. मोरे यांची भेट घेतली. डॉ. मोरे यानंतर जिल्हाधिकारी रेखाराव यांच्याकडे गेले. तेथून रेखाराव यांनी सौरभ विजय यांच्याशी चर्चा केली. नेमका पगार का होत नाही याबाबतही चर्चा झाल्यानंतर चार दिवसात वेतन देण्याची ग्वाही त्यांनी दिली. यानंतर रेखाराव यांनी आपण या प्रकरणाचा वैयक्तिक पातळीवर पाठपुरावा करतो असे सांगून कोरोनाचा गंभीर काळ असल्याने आंदोलन न करण्याची विनंती केली. त्यानुसार आंदोलन मागे घेत सर्व डॉक्टर दुपारी चार नंतर कामावर हजर झाले.
चौकट
तीन मंत्री असून असे कसे होते..?
पगाराच्या मागणीसाठी सीपीआर आवारात सर्व डॉक्टर्स एकत्र आले होते. हे सर्वजण अधिष्ठाता कार्यालयासमोर उभे असताना सीपीआरमधील रूग्णांच्या काही नातेवाईकांनी कशासाठी आंदोलन आहे अशी विचारणा केली. तेव्हा आमचा पगार झाला नाही असे डॉक्टरांनी सांगितले. तेव्हा जिल्ह्यात तीन मंत्री, त्यातीलही एक आरोग्य खात्याचे मंत्री असूनही पगार कसा मिळत नाही अशी विचारणा या नातेवाईकांनी केली. तुम्ही संपावर गेल्यामुळे आमच्या पेशंटना काय झाले तर त्याला जबाबदार कोण अशीही विचारणा यावेळी करण्यात आली.
२३०७२०२१ कोल सीपीआर ०१
चार महिन्यांचा पगार नसल्याने कोल्हापुरातील सीपीआरमधील ५८ डॉक्टरांनी गुरूवारी सकाळपासून काम बंद आंदोलन केले.