कोल्हापूर : शहरातील थेट पाईपलाईन, कचरा प्रकल्पांसह टिपर, नगरोत्थान आदी कामे रखडल्याने ती मार्गी लावण्यासाठी अधिकाऱ्याना ‘टाईम बाँड प्रोग्रॅम’ ठरवून दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक घेतली असून शहराला स्वच्छ व मुबलक पाणीपुरवठा करण्यासासाठी काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजना येत्या सहा महिन्यांत पूर्ण होईल, असा दावा आमदार सतेज पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला. महापौर सरिता मोरे, उपमहापौर भूपाल शेटे तसेच अधिकारी उपस्थित होते.आमदार पाटील म्हणाले, महानगरपालिका निवडणुकीत विकासकामांचे आश्वासन दिल्याप्रमाणे मी दर तीन महिन्याला आढावा बैठक घेतो. निवडणुकीची आचारसंहिता संपल्यामुळे ही आढावा बैठक घेतली असून त्यामध्ये कोणतेही राजकारण नसल्याचा खुलासाही त्यांनी सुरुवातीसच केला.थेट पाईपलाईन पाणी योजनेची दर आठवड्याला पाहणी करून काम युद्धपातळीवर सुरू असल्याबाबत आमदार पाटील यांनी आयुक्तांचे अभिनंदन केले. आमदार पाटील म्हणाले, जॅकवेल आणि इनटेकवेलची कामे युद्धपातळीवर सुरू असून इनटेकवेलचे ३३०० क्युबिक मीटरपैकी १३०० क्युबिक मीटरचे काम जूनअखेर पूर्ण होईल.
४६ किलोमीटर लांब जलवाहिनी बसविण्याचे काम पूर्णत्वास असून त्यापैकी ६ किलोमीटरचे काम अपुरे आहे, ३.५ किलोमीटर लांबीचे काम जूनपूर्वी पूर्ण होईल तर २.५ कि.मी. लांबीच्या कामासाठी सोळांकूर ग्रामस्थांचा विरोध आहे, पुढील आठवड्यात आयुक्त डॉ. कलशेट्टी सोळांकूर ग्रामस्थांची समजूत काढतील. त्यामुळे हे पाईपलाईनचे सर्व काम येत्या सहा महिन्यांत पूर्ण होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली.घरफाळा व बांधकाम विभागात संलग्नीकरणते म्हणाले, घर बांधताना जास्तीत-जास्त जागेचा परवाना घेतला जातो अन् प्रत्यक्षात कमी जागेतील बांधकामाची आकारणी केल्याचे दिसते. त्यामुळे घरफाळा आणि बांधकाम परवाना विभागाचे संलग्नीकरण आवश्यक आहे.‘झूम’ कचऱ्याचे होणार कॅपिंगझूम प्रकल्पावर सुमारे ४ लाख टन कचरा पडून आहे. तो कॅपिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. कचºयावर ‘बायोटेक्नॉलॉजी’चा अद्ययावत वापर करून प्रक्रिया करण्यात येणार आहे. त्यामुळे किमान २० टक्के कचरा कमी होईल तसेच ‘झूम’च्या कॅपिंगभोवती पावसाळ्यात जूननंतर किमान १० हजार झाडे लावण्यात येतील, असेही त्यांनीस सांगितले.‘आयटी’मधील प्लॉट कोल्हापूरसाठी आरक्षितते म्हणाले, टेंबलाईवाडी येथे महापालिकेच्या जागेवर आग्रही भूमिका घेऊन ‘आयटी पार्क’ उभारण्याचा प्रयत्न केला. नव्या ‘आयटी पार्क’मध्ये टॉवर उभारून त्यात कोल्हापूरच्या ‘आयटी असोसिएशनला ५० टक्के प्लॉट आरक्षित ठेवण्याचा निर्णय झाला. त्यासाठी पिंपरी-चिंचवाड आणि नाशिक महापालिकेतून माहिती घेण्याचे काम सुरू आहे.
पदाधिकारी, अधिकाऱ्यांची बैठकमहापालिकेतील रखडलेली कामे पूर्णत्वासाठी आमदार पाटील यांनी घेतलेल्या बैठकीस, महापौर सरिता मोरे, आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्यासह उपमहापौर भूपाल शेटे, माजी महापौर हसिना फरास, प्राथमिक शिक्षण मंडळ सभापती अशोक जाधव, सभागृह नेते दिलीप पवार, डॉ. संदीप नेजदार, अभिजित चव्हाण, शोभा कवाळे यांच्यासह अतिरिक्त आयुक्त श्रीधर पाटणकर, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, नगरसचीव दिवाकर कारंडे, मुख्य आरोग्य निरीक्षक डॉ. विजय पाटील आदी उपस्थित होते.