आॅनलाईन लोकमतकोल्हापूर : विविध प्रलंबित मागण्यांसाठी राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी पुकारलेले असहकार आंदोलन बुधवारी मागे घेतले. त्यामुळे बारावीचा निकाल वेळेत लागण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सकारात्मक चर्चा करून शिक्षकांच्या मागण्यांची पूर्तता करण्याबाबत लिखित आश्वासन दिल्याने आंदोलन स्थगित केले असल्याचे महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाचे राज्य कार्याध्यक्ष प्रा. अविनाश तळेकर यांनी बुधवारी दिली.या चर्चेत शिक्षणमंत्री तावडे यांनी विविध मागण्यांबाबत सकारात्मक कार्यवाहीचा निर्णय दिला. यात २ मे २०१२ नंतरच्या नियुक्त शिक्षकांच्या नियुक्ती मान्यतेसाठी १५ ते १९ एप्रिल २०१७ या कालावधीत विशेष वैयक्तिक मान्यता शिबिर घेण्यात येईल. सन २००३ ते २०१०-११ पर्यंतच्या मंजूर वाढीव पदावरील नियुक्ती मान्यता राहिलेल्या ५९९ शिक्षकांनाही एप्रिल २०१७ मधील विशेष मान्यता शिबिरामध्ये मान्यता देण्यात येईल. त्यानंतर त्यांच्यासाठी आर्थिक तरतूद करण्यात येईल. सन २०११-१२ पासूनच्या वाढीव पदांना उच्चस्तरीय समितीच्या मान्यतेसाठीची कार्यवाही तातडीने करण्यात येईल. कायम विनाअनुदानित कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांना माध्यमिकप्रमाणे अनुदान देण्याबाबत मे २०१७ मध्ये राज्य महासंघाबरोबर बैठक घेऊन निर्णय घेण्यात येईल. माहिती तंत्रज्ञान विषय शिक्षकांना वेतन अनुदान देण्यात येईल. स्वयंअर्थसाहाय्य तत्त्वावर यापुढे आवश्यकता असेल, तरच शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना परवानगी देण्यात येईल, अशा मागण्यांचा समावेश आहे, अशी माहिती कार्याध्यक्ष प्रा. तळेकर यांनी दिली. (प्रतिनिधी)मूल्यमापनाची घाई नकोअसहकार आंदोलनातील सहभागी परीक्षक, नियामकांनी मूल्यमापन अथवा नियमनाचे कामकाज शिक्षण मंडळाच्या नियमाप्रमाणे सुरू ठेवावे, असे आवाहन कार्याध्यक्ष तळेकर यांनी केले. ते म्हणाले, दि. ३ मार्चपासून संथगतीने उत्तरपत्रिका मूल्यमापनाचे काम सुरू झाले. त्यामुळे २५ फेब्रुवारीपासून झालेल्या सुरुवातीच्या विषयांच्या परीक्षकांचे कामकाज पूर्ण झालेले नाही. त्यांनी ते योग्य पद्धतीने पूर्ण करावे. याबाबत घाई करू नये. कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक हे बारावीचा निकाल वेळेत लावण्यासाठी राज्य शिक्षण मंडळास सहकार्य करतील.
बारावीचा निकाल लागणार वेळेत
By admin | Published: March 15, 2017 6:28 PM